अहमदनगर- अकोले तालुक्यातील वाघापूर येथील गंभीरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनींनी काही दिवस शिक्षकाचा त्रास सहन केला. मात्र, नंतर त्यांनी शिक्षकाची तक्रार आपल्या पालकांकडे केली. नंतर पालकांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिक्षकाला चपलांनी मारले. दरम्यान, या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
दत्तू पांडुरंग पिचड, असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. याबाबत शाळेतील एका मुलीच्या पालकांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जिल्हा परिषदेच्या वाघापूर येथील गंभीरवाडी शाळेतील शिक्षक दत्तू पांडुरंग पिचड (रा. पिंपरकणे ता. अकोले) हा शिक्षक गेल्या अनेक दिवसांपासून शाळेतील अल्पवयीन मुलींशी छेडछाड व गलिच्छ प्रकार करत होता. दुपारी जेवणाच्या सुट्टीत फिर्यादीची मुलगी व तिच्या मैत्रिणींना दत्तू पिचड याने किचनच्या शेडमध्ये बोलावले व त्यांच्याशी अश्लील व गैरवर्तन केले. आणि हा प्रकार घरी सांगायचा नाही, असा दम दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर प्रकरणी फिर्यादीने काल सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंभीरवाडी वाघापूर येथे जाऊन शिक्षक पिचड यांना विचारणा केली होती. माझी चूक झाली यापुढे मुलींना त्रास देणार नाही, असे पिचड याने पालकाला म्हटले. यावेळी इतर मुलीनीही पालकांना त्यांच्या सोबत झालेल्या अत्याचाराला वाचा फोडला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गु.र.न.४४८/१९ भा.द.वि कलम बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम तसेच भा.द.वि.च्या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिपक ढोमणे करत आहे.
दरम्यान, सदर शिक्षाकाला अनेक वेळा ग्रामस्थ तसेच पालकांनी समज देऊन सोडून दिले होते. मात्र, शिक्षक सुधारला नसल्याने आज पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. पालकांनी व गावातील नागरिकांनी काल सकाळी शाळा भरल्यानंतर पिचडला चोप दिला. यावेळी महिलांनी पिचडला चपलानी हाणले होते.
हेही वाचा- शिर्डी साई बाबा मंदिरात नाताळ साजरा.. दिला सर्वधर्म समभावनेतेचा संदेश