अहमदनगर - अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे थर्टी फर्स्टला यावर्षी गालबोट लागले आहे. राजुर पोलिसांनी भंडारदऱ्याजवळील मुरशेत येथे एका टेंट हाऊसवर धाड टाकून चार लाख दहा हजार रुपये किमतीच्या दारूसह चारचाकी वाहन ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी एका शिक्षकासह दोघांना अटक केली आहे.
भंडारदरा येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नविन वर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक आले होते. या पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी राजुर पोलीस 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पेट्रोलिंग करत होते. भंडारदऱ्यापासून जवळच मुरशेत येथील एका टेंट हाऊसमध्ये पर्यटकांना वाढीव दराने दारू विक्री होत असल्याची माहिती, राजुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन पाटील यांच्या लक्षात आले. राजुर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार लाख दहा हजार रुपये किंमतीच्या दारुचे दोन बाॅक्स व एक चारचाकी गाडी ताब्यात घेतली.
यावेळी या टेंटच्या मालकाने राजुर पोलिसांना 'जर माझ्यावर कारवाई केली तर मी आत्महत्या करेल', अशी धमकी दिली. विशेष म्हणजे हा टेंटचालक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. राजुर पोलिसांनी दोन व्यक्तींना या संदर्भात ताब्यात घेतले असुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अजूनही काही छुपे रुस्तम या परिसरात दारू विक्री करत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, शिक्षकी पेशात असणारे लोक अवैध दारूच्या व्यवसायात उतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.