अहमदनगर - कोरोना संकट काळात लोक कलावंतावर उपासमारीची वेळ आली. मात्र, राज्य सरकारने त्यांना एका पैशाचीही मदत केली नाही. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 21 सप्टेंबरला नारायणगाव येथे तमाशा कलावंत एका दिवसाचे उपोषण करणार आहेत. महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत उकस मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण होणार आहे.
कोरोनामुळे सर्वच व्यवसाय संकटात सापडले आहेत. आता अनलॉकनंतर काही व्यवसाय हळूहळू मार्गावर येत आहेत. मात्र, लोक कलावंतांना अद्यापही काम मिळालेले नाही. महाराष्ट्रातील तमाम लोक कलावंतांचा यावर्षीचा हंगाम निघून गेला आहे. कोरोनामुळे सर्व सांस्कृतिक कार्यक्रमच रद्द झाल्याने या कलावंतांकडे उपजीविकेसाठी पैसे शिल्लक नाहीत. राज्यातील विविध संघटनांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारला आर्थिक मदतीची विनवणी केली आहे. मात्र, अद्यापही या विषयावर सरकार जागे झालेले नाही. म्हणूनच तमाशाची पंढरी अशी ओळख असणार्या नारायणगाव येथील तमाशा सम्राज्ञी (कै) विठाबाई नारायणगाव यांच्या स्मारकासमोर लोककलावंतांनी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती रघुवीर खेडकर यांनी दिली.
ज्या ठिकाणावरून तमाशा घडला आणि ज्या विठाबाईंनी तमाशा कलावंताचे नाव जगभर पसरवले त्यांच्या गावातूनच कलावंतांच्या मागण्यांसाठी संघर्षाचा शुभारंभ करणार आहेत, असे रघुवीर खेडकर म्हणाले. (कै) विठाबाई नारायणगावकर यांचा मुलगा कैलाश, मुलगी मालती इनामदार, नातू विशाल तसेच महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक कलावंत विकास मंडळाचे सचिव मुसाभाई इनामदार, उपाध्यक्ष राजू बागुल, संजय महाडीक, शांताबाई संक्रापुरकर आदी लोककलावंत या आंदोलनात सहभागी होणार आहेत.