अहमदनगर - राज्यात भौगोलिक विस्ताराने सर्वात मोठ्या असलेल्या जिल्ह्यातील पोलीस दलातील 138 पोलीस कर्मचारी-अधिकारी आतापर्यंत कोरोनाबाधित झालेले आहेत. तर संपर्कात आलेले 63 पोलीस कुटुंबीयांना पण कोरोनाची बाधा झालेली आहे. या बाधित कर्मचाऱ्यातील दोन पोलिसांचा दुर्दैवाने आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
बाधित झालेल्या 138 कर्मचाऱ्यांपैकी 96 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या 42 जणांवर उपचार सुरू आहेत. यासर्व परिस्थितीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी जातीने लक्ष ठेवून बाधित कर्मचारी आणि संपर्कामुळे बाधित झालेल्या पोलीस कुटुंबियांची काळजी घेत आहेत. त्यांना सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, याची काळजी घेत असल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिली.
बाधित पोलीस कर्मचाऱ्यांना कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर वा गरजेनुसार कोविड हेल्थ स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भर्ती करून उपचार केले जात आहेत. पोलिसांसोबत कार्यरत असलेले होमगार्ड आणि एसआरपीएफच्या जवानांची पण नियमित तपासणी करून काळजी घेत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. नगर जिल्ह्यात एकूण तीन हजाराच्या जवळ पोलीस कर्मचारी-अधिकारी बळ असून यातील जवळपास सातशे कर्मचारी हे पंचावन्न वर्षांवरील असल्याने त्यांना आजारी रजा मंजूर केलेली आहे.