अहमदनगर- फोटोसेशनमुळे डॉ. सुजय विखे हे पुन्हा एकदा नेटकरी व विरोधकांकडून ट्रोल झाले आहेत. कालपासून चारा छावणीत जनावरांना ऊसाची मोळी चारतानाचा सुजय विखे यांचा फोटो सध्या टीकेचा धनी ठरत आहे. हा फोटो पारनेर तालुक्यातील एका चारा छावणीला भेट देतानाचा असून त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह अनेक नेते दिसत आहेत.
जनावरांना ऊसाचा चारा देताना अखंड ऊस न देता ऊसाचे तुकडे करून दिले जातात. मात्र फोटो काढताना डॉ. सुजय यांच्यासह नेते मंडळी ऊसाची बांधलेली आख्खी मोळी जनावरांपुढे खाऊ घालण्यासाठी धरलेले दिसून येत असल्याने ही मंडळी ट्रोल होत आहे. त्यात सुजय विखे डॉक्टर असल्याने त्यांच्या पदवीचा आणि प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असल्याने त्यांच्या पदाचा उपहासात्मक उल्लेख विरोधक आणि ट्रोलर्सकडून होत आहे.
ऊसाच्या गव्हाणीत ऊसाची मोळी टाकताना ज्या पद्धतीने टाकली जाते तसा अविर्भाव फोटोत असल्याने ही टीका होत आहे. गेल्या ४ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांचे निधन झाले होते. त्यावेळी डॉ. सुजय विखे हे अंत्यदर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी हार घालून पोज देत असताना त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. हा फोटोही असाच चर्चेत आला होता. मृत व्यक्तीसोबत फोटो काढून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा डॉ. सुजय यांनी प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. सोशल माध्यमातुन यावर उपरोधात्मक कमेंट्स आल्या होत्या. त्यामुळे डॉ. सुजय हे वारंवार वादात्मक फोटोसेशनमुळे टीकेचे धनी ठरत आहेत.
वास्तविक अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. ७ तालुक्यात हजारांवर गावात साडे अठरा लाख मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची नाकेनऊ येत आहेत. त्यामुळे कमी वेळेत आणि जास्तीत जास्त मतदारांपुढे आपली छबी सतत राहावी यासाठी सर्वच उमेदवार किंवा त्यांचे समर्थक सोशल मीडियाचा वापर करताना दिसून येत आहेत. यासाठी व्हाट्सअप्पचे अनेक ग्रुप, फेसबुक पेज तयार करण्यात आले आहेत. त्यातून उमेदवारांचा पद्धतशीर आणि प्रभावी प्रचार व्हावा या दृष्टिकोनातून फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्यात येत आहेत. मात्र याच फोटोंचा आधार घेत एकमेकांचे विरोधक उमेदवाराला ट्रोल करतानाही आता दिसून येत आहेत. याचा फटका परस्परांना होत असला तरी सध्या तरी डॉ सुजय विखे हे त्यांच्या काही फोटोंमुळे अधिक टीकेचे धनी होताना सोशल माध्यमात दिसून येत आहेत.