अहमदनगर - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळालेले डॉक्टर सुजय विखे यांनी आज सकाळी विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. विद्यमान खासदार असताना उमेदवारी न मिळाल्याने गांधी हे नाराज असून त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. या परिस्थितीत नाराज असलेल्या गांधींची समजूत काढण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना प्रचारात सक्रिय होण्याची विनंती करण्यासाठी सुजय विखे यांनी ही भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विशेष म्हणजे या भेटीच्यावेळी खासदार गांधी यांचे पुत्र सुरेंद्र हे अनुपस्थित होते. यावेळी या दोघात झालेल्या चर्चेत सुजय यांनी खासदार गांधी यांना प्रचारात सक्रिय होण्यासाठी विनंती केली. एक एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही सुजय यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार गांधी यांनी सुजय विखे यांना मी जनसंघापासून पक्षाचे काम करत आलो असून पक्षाची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
राधाकृष्ण विखे यांनी परवा घेतली होती गांधी यांची भेट-
गेल्या दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे पाटील यांनीही खासदार गांधी यांची भेट घेऊन दोन तास बंद खोलीत चर्चा केली होती. या चर्चेत त्यांनी गांधी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. आता सुजय यांनीही नाराज खासदार गांधी यांची भेट घेतल्याने ते आता प्रचारात सक्रिय होणार का आणि त्याचबरोबर सुवेंद्र गांधी हे आपली अपक्ष उमेदवारी मागे घेणार का याबद्दल उत्सुकता दिसून येत आहे.