अहमदनगर- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे यांच्याकडे ११ कोटी १७ लाखांची संपत्ती आहे. तर, पत्नी धनश्री सुजय विखे यांच्याकडे ५ कोटी ७ लाखांची संपत्ती आहे. सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी भरलेल्या उमेदवारी अर्जात शपथपत्रावर सुजय विखे यांनीसर्वप्रकारची मालमत्ता, कर्ज, विमा-पॉलिसी, पोलीस दप्तरी रेकॉर्ड याबद्दलची माहिती निवडणूक आयोगाकडे लेखी शपथपत्रावर सादर केली.
डॉ. सुजय यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. पत्नी धनश्री यांच्यावर प्रवरा बँकेचे २६ लाख २३ हजारांचे कर्ज आहे. विखे यांचे नाव राहाता विधानसभा मतदारसंघांमध्ये नोंदविले गेले असल्याचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. सुजय यांच्याकडे ४ कोटी ९१ लाख रुपयांची जंगम आणि ६ कोटी २५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
डॉक्टर सुजय विखे यांचे उत्पन्न घटले -
गेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ६८ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न घटून सुजय विखे यांचे वार्षिक उत्पन्न ८६ लाख १० हजार २०२ रुपये इतके झाले आहे. पत्नीचे वार्षिक उत्पन्न ३५ लाख ४२ हजार आहे. दोघांवर एकही गुन्हा दाखल नाही. सुजय विखे यांच्याकडे केवळ १ लाख १६ हजार २९५ रुपयांची रोकड आहे. पत्नीकडे १ लाख २७ हजार ४८५ रुपयांची रोकड आहे.
सुजय यांच्याकडे ३ कोटी ६५ लाख २३ हजार ४६८ तर, पत्नीकडे १ कोटी ९० लाख ९१ हजार ६१७ रुपयांच्या बँक खात्यातील ठेवी आहेत. सुजय यांच्याकडे ५ लाख ७१ हजार ३०१ रुपयांचे आणि पत्नीकडे ६७ हजार रुपयांचे शेअर्स गुंतवणूक आहे. विखे यांची १६ लाख ६५ हजार रुपयांची तर, पत्नीकडे ५ लाख ८५ हजार रुपयांची विमा पॉलिसी आहे.