अहमदनगर - आम्हाला पक्ष सोडायचा नव्हता. पण, ही परस्थिती आणली गेली. तरीही आम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे. सूर्य योग्य दिशेलाच उगवला आहे. लवकरच महाराष्ट्रात कर्नाटक, मध्यप्रदेशची पुनरावृत्ती दिसेल, असे अजित पवारांच्या टीकेला भाजप खासदार सुजय विखे यांनी उत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी कर्जत येथील कार्यक्रमात विखे पिता-पुत्रांनी लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी केलेल्या पक्षांतरावर नाव न घेता टीका केली होती. त्यांना वाटले सूर्य उगवेल इकडे, पण उगवला तिकडे, असे म्हणत अजित पवारांनी टीका केली होती.
यावर पारनेर येथे सुजय विखे यांनी पवार यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. यावेळी विखे म्हणाले, सूर्य योग्य ठिकाणीच उगवला आहे. अपवादात्मक आलेल्या सत्तेवरील भाषणावर मी काय टीका करणार नाही. कर्नाटक, मध्यप्रदेशची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही लवकरच होणार आहे, असे विखे म्हणाले.