अहमदनगर - कोरोनाच्या दुसर्या लाटेत नागरिकांच्या मदतीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषदेने सर्वात प्रथम विविध उपाययोजना करून जनतेला मोठा दिलासा दिला. या काळात मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी काहींचे नातलग पुढे येत नसताना नगरपरिषदेचे कर्मचारी अरविंद गुजर, सतीश बुरंगले व आनंद शेळके यांनी कोरोना लाटेतील रुग्णांचे अंत्यविधी करत दर्शवलेली माणुसकी ही सर्वांसाठी आदर्शवत ठरली आहे. या कोरोना योद्ध्यांचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे, यांच्या हस्ते नगरपरिषदेकडून विशेष सन्मान करण्यात आला.
एकशे साठ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या संगमनेर नगर परिषदेने कोरोनाच्या दुसर्या लाटेत सर्वात प्रथम नागरिकांसाठी कोवीड केअर सेंटर सुरू करण्याबरोबरच जेवणाची व्यवस्था, औषध पुरवणे, बेडची उपलब्धता करून देणे, रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देणे, रुग्णवाहिका, बायपॅप मशीन, आरटीपीसीआर मशीन उपलब्धता अशा अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या. संगमनेर हे वैद्यकीय सुविधा, व्यापार, बाजारपेठ, वदळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्याने राहाता, शिर्डी, कोपरगाव, पारनेर, श्रीरामपूर, सिन्नर, अकोले, जुन्रर अशा विविध भागातून अनेक लोक उपचारासाठी येथे येत होते.
या सर्व काळामध्ये काहींना कोरोना बरोबर लढताना मृत्यूला सामोरे जावे लागले. कोरोनाची भीती, शासकीय नियम, अंत्यविधीसाठी अवघड परिस्थिती अशा काळात अनेक रुग्णांचे नातेवाईक जवळ येण्याचे टाळत असताना मृत झालेल्या रुग्णांची हेळसांड होऊ नये याकरता नगरपरिषदेने सातत्याने पुढाकार घेतला. कोरोनाबाधित, कोरोनासंशयित व इतर अशा सुमारे 175 मृतांचा अत्यंविधी नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी अरविंद गुजर, सतीश बुरंगले, आनंद शेळके यांनी या कठीण काळात रात्रंदिवस काम केले. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक जवळ येत नसत किंवा काही जण उपस्थित नाही राहत नव्हते. अशा वेळी अनेक मृत व्यक्तींना त्यांनी पाणी पाजणे, त्यांचा सर्व संस्कार करणे ही कामे पार पाडली. मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आपण आहोत या मानवतेच्या भावनेतून मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार केले. या कोरोना योद्ध्यांनी संकटात जपलेली ही माणुसकी सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे.
अत्यंत संकटसमयी मानवतेतुन काम करणार्या या कर्मचार्यांचा नगर परिषदेच्यावतीने विशेष सन्मान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री व सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल आणि शहरातील सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला असून त्यांच्या कामाबद्दल कौतुकाची थाप दिली आहे.