अहमदनगर - अकोले तालुक्यातील पिंपळदरावाडी येथील सोनाबाई विठ्ठल भांगरे या आदिवासी महिलेने गावच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आदिवासी कुटुंबांना स्थायी रोजगार निर्माण व्हावा व शेतीच्या माध्यमाने त्यांचे उत्पादन वाढावे. बाहेर गावी जाऊन मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांचे स्थलांतर कायमस्वरूपी थांबावे यासाठी 'बायफ' या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेबरोबर त्यांनी आपल्या गावातील बचत गटांना जोडले. त्यांच्या मार्गदर्शनाने गावामध्ये त्यांनी गावामध्ये पिण्यासाठी व शेतीसाठी लागणारे पाणी साठवणूकीसाठी काम केले. यामुळे त्यांना 'जलमाता' म्हणून विविध ठिकाणी गौरवण्यात आलेले आहे.
गावातील पाणी टंचाई केली दूर -
अत्यंत गरीब परिस्थितीत वाढलेल्या सोनाबाई यांची पिंपळदरावाडी या गावात 4 एकर कोरडवाहू शेती होती. लहरी पावसाच्या अधीन असलेली भातशेती व इतर पिकांवर आपली उपजीविका चालवणे त्यांना अत्यंत कठीण जात होते. या गोष्टीची माहिती त्यांनी 'बायफ' संस्थेला बचत गटांच्या माध्यमातून कळवली. त्यांच्या मागणीची दखल घेत सोनाबाई यांच्या मार्गदर्शनाने पिंपळदरावाडी गावांमध्ये सुमारे अठरा ते वीस इंधन विहिरी, एक कमी खर्चाचा वळण बंधारा ,एक लिफ्ट इरिगेशन, दोन झरे विकास इत्यादी कामे मार्गी लागली आहेत. गावातील पाणी गावातच कसे राहील व शेतीला उपयोगी कसे पडेल यासाठी सोनाबाई भांगरे यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने उपरोक्त कामे मार्गी लावली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गावांमधील बागायत क्षेत्र 60 ते 70 एकर वर वाढले व त्याचा परिणाम रोजगार निर्मितीवर झाला. गावातील सत्तर ते ऐंशी कुटुंब कायमस्वरूपी स्थलांतरापासून वाचली. त्यांच्या प्रयत्नातून पिण्याच्या पाण्यासाठी गावालगत असलेल्या दोन जिवंत झऱ्यांची दुरुस्ती करून घेण्यात आली आहे. त्याचा उपयोग करून गावातील 60 ते 70 घरांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत आहे. तसेच पाळीव प्राण्यांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.
विविध ठिकाणी कार्याचा गौरव -
गावच्या विकासामध्ये खासकरून शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याच्या विविध योजना राबवून सोनाबाई भांगरे यांनी गाव समृद्ध करण्यासाठी विशेष योगदान दिले आहे. या कामामुळे त्यांना 'जलमाता' म्हणून संबोधले जाते. नुकतेच त्यांना पुणे येथील शारदा शक्ती संस्थेने विज्ञान भारतीचे राष्ट्रीय समन्वयक व मार्गदर्शक जयंतराव सहस्रबुद्धे व डॉक्टर लीना बावडेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कामातून अनेक महिलांनी बोध घेत ग्रामीण विकासामध्ये आपला ठसा उमटवला आहे. जलमाता सोनाबाई भांगरे यांच्या विशेष प्रयत्नातून गावचा शिवार हिरवागार आणि पाणीदार होण्यासाठी विशेष मदत झाली आहे. याकामी बायफ संस्था व जनरल मिल्स फाउंडेशन यांचे विशेष योगदान राहिले आहे. या भागामध्ये आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत ही सर्व कामे मार्गी लावण्यात आली आहे. ही कामे करून घेण्यासाठी जलमाता सोनाबाई भांगरे यांनी विशेष पुढाकार घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.