नेवासा - अहमदनगर जिल्हातील भेंडे येथे रविवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. मुलीच्या कारणावरून व घटनेतील जुन्या वादातील लोकांना अद्दल घडवण्याच्या उद्देशाने जखमी सोमनाथ तांबे यांच्या मित्रांनीच गोळीबार नाट्य घडवून आणल्याचा प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडे येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास खेळताना झालेल्या गोळीबारात सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय 29, रा. भेंडे) हा तरुण जखमी झाला. या तरुणाने या प्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत कुकाण्यातील दोघांची नावे संशयित म्हणून नमूद केली. पोलिसांनी कुकाण्यातील दोघा संशयितांना रात्रीच ताब्यात घेतले. पोलिसांच्या तपासात या प्रकरणाची उकल झाली आहे. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून शत्रूला गुंतवण्यासाठी घडवून आणल्याचे तपासात पुढे आले. नंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलवत खेळत असलेल्या काही मित्रांचीच साखळी या प्रकरणात असल्याचे दिसताच, रात्री काहींना ताब्यात घेतले.
कुकाण्यातील दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांशी गेल्या दोन महिन्यांपूर्वी मारामारी झाली होती. याचा राग मनात धरून गोळीबार करण्याचा व त्यात शत्रूला अडकवण्याचा कट रचण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी शुभम विश्वनाथ गर्जे, स्वप्नील बाबासाहेब बोधक, अमोल राजेंद्र शेजवळ, अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे यांच्यासह एकूण 10 आरोपींना अटक केली असून एक गावठी कट्टा हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय करे यांनी दिली आहे.