अहमदनगर - संगमनेरातील मानाच्या अशा रंगारंगल्लीतील सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कोरोनाच्या सावटामुळे प्रथमच गणरायाला ढोलताशाविना आणि मर्दानी खेळाच्या आयोजनाविना निरोप दिला गेला आहे.
सन 1895 साली या सोमेश्वर गणरायाची प्रथम स्थापना करण्यात आली होती. दरवर्षी, वाजत गाजत या गणरायाची मिरवणूक काढत विसर्जन केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे साध्या पद्धतीने विसर्जन केले जात आहे. संगमनेर शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. यंदा प्रशासनाने नदीवर गणेश विसर्जन करण्यास बंदी घातली आहेत. तसेच कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी शहरात नगरपालिका आणि एकवीरा फाऊडेंशनच्या वतीने शहरात सोळा संकलन केंद्रेही करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तर, यंदाचा गणेशोत्सवसुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने राज्यभरात साजरा करण्यात आला. संगमनेरातील सोमेश्वर गणरायाची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी बोलताना कळसाचे दर्शनसुद्धा मनाला शांती देणारे असते असे थोरात म्हणाले. गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याबाबत खबरदारी घेत प्रशासन सज्ज आहे. मात्र, नागरिकांनी सुद्धा काळजी घेणे गरजेचे असल्याचेही अवाहन थोरात यांनी नागरिकांना केले आहे.
हेही वाचा - पावसामुळे भाजीपाला शेतीचे नुकसान; आवक घटल्याने भाज्यांचे दर वाढले