अहमदनगर - विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याअगोदरच अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. श्रीरामपूरमधील काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केला.
मात्र, त्यांचा हा पक्ष बदल श्रीरामपुरातील मतदारांना रूचला नाही. कांबळेंच्या विरोधात श्रीरामपूर शहरासह आसपासच्या भागात अज्ञात व्यक्तींनी फलक लावले आहेत. या फलकांवर 'आमचं ठरलंय सत्तेसाठी थोरात आणि विखेंना फसवणाऱ्याला पाडायचं', असा मजकूर लिहलेला आहे. यामुळे कांबळेंच्या विरोधातील नाराजी आता जाहीर स्वरूपात पुढे आली आहे.
हेही वाचा - भाजपची आज तिसरी मेगाभरती, हर्षवर्धन पाटलांसह गणेश नाईकांचा प्रवेश
शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनाही कांबळेंचा सेना प्रवेश रुचलेला नाही. त्यामुळे कांबळे यांच्या अडचणीत वाढ होणार, असे चित्र आहे. दरम्यान, पोलिसांना फलक लावल्याची माहिती मिळताच त्यांनी हे फलक काढण्याचे काम सुरू केले.