शिर्डी (अहमदनगर) PM Narendra Modi on Sharad Pawar : महाराष्ट्रातील काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केलं, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शरद पवार यांच्यावर केली. यूपीए सरकारच्या काळात कृषी खात्याची धुरा शरद पवार यांच्याकडं होती. त्यावरुनही मोदींनी पवारांवर निशाणा साधलाय. शिर्डी साई मंदिरात अनेक विकास (PM Narendra Modi Shirdi Visit) प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.
अजित पवारांसमोरच शरद पवारांवर निशाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी शिर्डीजवळील गावात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यावर अजित पवार यांच्यासमोरच टीका केली. सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी (शरद पवार) देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केलं परंतु, आमच्या सरकारनं सात वर्षात साडे तेरा लाख कोटी रुपयांच्या 'एमएसपी'वर धान्य खरेदी केल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.
शरद पवरांवर निशाणा : आमचं सरकार शेतकरी कल्याणासाठी वचनबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठीचे पैसे आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. महाराष्ट्रात काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केलं. महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्यानं देशाचं कृषिमंत्री म्हणून काम पाहिलं. मी वैयक्तिकरित्या त्यांचा आदर करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी पवारांचं नाव न घेता विचारला.
शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा : मागील दहा वर्षांत देशातील नागरिकांना निराश केलं नाही. गरीब कल्याणासाठी सरकारचं बजेटही वाढत आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत गरीबांना मोफत उपचारांसाठी 70 हजार कोटी खर्च केले असून, गरीबांच्या घरांसाठीही सरकारनं 40 लाख कोटी रुपये खर्च केले. 'हर घर जल' पोहोचवण्यासाठीही आतापर्यंत 2 लाख करोड रुपये खर्च करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' सुरू केली. शेतकऱ्यांना आता वर्षाला एकूण 12 हजार रुपये मिळणार असल्याचे मोदी म्हणाले. तसेच लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात गुरुवारी दोन हजार रुपये जमा झाले आहेत.
बाबा महाराज सातारकर यांचं कार्य प्रेरणादायी : बाबा महाराज सातारकरांच्या निधनाचं वृत्त ऐकलं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना मी करतो. बाबा महाराज सातारकर हे देशाचं वैभव होते. वारकरी संप्रदायाचा गौरव असलेले बाबा महाराज सातारकर वैकुंठवासी झाले. कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून जनजागृतीचं केलेलं काम हे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे. बाबा महाराज सातकरकर यांची वाणी आणि शैली लोकांचं मन जिंकत असे. त्यांच्या वाणीमध्ये कायमच जय जय रामकृष्ण हरी या भजनाचा प्रभाव आपण सगळ्यांनी पाहिला आहे. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
हेही वाचा -