अहमदनगर- जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठे शक्तिप्रदर्शन करत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एक भव्य रॅली काढून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राम शिंदे आपल्यासामोर आव्हान नसून मतदारसंघातील प्रश्न सोडवणे हे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. पालकमंत्री राम शिंदे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यासाठी उदयनराजे उपस्थित राहणार आहेत. याबाबत विचारले असता त्यांनी मतदारसंघात जातीपातीचे राजकारण करण्यापेक्षा राम शिंदेंनी विकासाची कामे केली असती तर निश्चित चांगले वाटले असते. उदयनराजे हे छत्रपतींचे वंशज असल्याने त्यांचे आपण स्वागत करू. मात्र, निश्चितपणे त्यांना मतदारसंघातील खराब रस्त्यांचा त्रास उद्या लक्षात येईल, असा टोमणा रोहित पवार यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा- राहुरीतून शिवाजी कर्डीलेच, नगराध्यक्ष कदम बंडाच्या दिशेने