अहमदनगर - शिर्डी आणि शिंगणापूर या महत्वाच्या स्थळाला जोडणाऱ्या कोपरगाव ते कोल्हार या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले असून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. परंतु अद्याप हा रस्ता काही दुरूस्त झालेला नाही. अशात कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी रस्ता दुरूस्तीसाठी भिक मागितली. या भिकेतून मिळालेली रक्कम त्यांनी रस्त्याच्या कामासाठी दिली.
मनमाड महामार्गवरील कोपरगाव आणि राहाता तालुक्याच्या हद्दीतील रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी नागरिकांनी उच्च न्यायालयात धावा घेतली आहे. महाराष्ट्र शासनाकडून जानेवारीपर्यंत खडी डांबराने खड्डे बुजवणार असल्याचे, उच्च न्यायालयाला सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणचे खड्डे मुरूमाने बुजावले गेली असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा रस्ता पुर्ण दुरूस्त झाला नाही म्हणून वैतागून कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव शहरातून दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत रस्ता दुरूस्तीसाठी भीक मागितली.
नागरिकांकडून मिळालेली भीक त्यांनी कोपरगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना देत ही रक्कम दान म्हणून सरकारकडे पाठवावी आणि कोपरगाव ते कोल्हार रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी केली. मात्र ही रक्कम स्वीकारण्यास कोपरगाव अधिकाऱ्यांनी नकार दर्शवला. तेव्हा काळे यांनी ही रक्कम थेट अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कुरियरद्वारे पाठवली.