अहमदनगर- स्वामिनाथन आयोग शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणाऱ होते. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारला मागण्यांसंदर्भात पत्रही लिहले होते. मात्र, केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच अद्यापही रामलीला मैदान व्यवस्थापनाने अण्णांना आंदोलनासाठी जागेची अनुमती न कळवल्याने आता अण्णांनी आपल्या गावातच अर्थात राळेगणसिद्धी मधेच आंदोलन करण्याचा निर्णय अंतिम केला आहे. येत्या ३० जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशी अण्णा यादवबाबा मंदिरात आपले बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करणार आहेत.
शब्द न पाळणे हे सरकारला अशोभनीय-
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार सी टू प्लस फिफ्टी या पद्धतीने शेतमाला भाव शेतकऱ्यांना मिळावा, दूध, फळे, भाजीपाला यालाही या पद्धतीनेच भाव मिळावा. या अण्णांच्या प्रमुख मागण्या आहेत, वास्तविक यासाठी अण्णा गेल्या चार वर्षां पासून आग्रही असून त्यासाठी त्यांनी दिल्लीत रामलीला मैदानात आणि राळेगणसिद्धी मध्ये असे दोनदा आंदोलने केली आहेत. दोन्ही आंदोलना वेळी केंद्र आणि तत्कालीन राज्यातील फडणवीस सरकार असताना केंद्रीय कृषी मंत्री आणि फडणवीस यांनी अण्णांची भेट घेऊन मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिलेले आहे. तसेच अर्थसंकल्पीय भाषणात याला मंजुरी दिल्याचे स्पष्ट केले आहे.
अण्णांना असे आश्वासन दिलेले असताना याची पूर्तता मात्र केंद्र सरकारने केलेली नाही. त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी यासाठी अण्णांनी पुन्हा एकदा उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अण्णांनी याबाबत काल (मंगळवारी) पुन्हा केंद्र सरकारला एक पत्र पाठवून दिलेली लेखी आश्वासन न पाळणे हे सरकारला अशोभनीय असल्याचे सुनावले आहे. सरकारच असे वागत असेल तर जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा? जर आश्वासने पाळणे जमत नसेल तर देऊ नका आणि तसे स्पष्ट सांगा, म्हणजे आम्हीही आपल्याकडे मागण्या करण्याचे सोडून देऊ, असेही परखडपणे मत व्यक्त करत अण्णांनी पत्रातून सरकारविरोधात खेद व्यक्त केला आहे.
काँँग्रेस काळात अण्णांनी लोकपालसाठी दोनदा आंदोलन केली. २०११ आणि २०१३ साली केलेल्या आंदोलनाच्या वेळी त्यावेळी विरोधात असलेल्या भाजप नेत्यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देत संसदेत काँग्रेस विरोधात मोठी राळ उडवली होती. त्यावेळी अण्णांचे कौतुक करणारी भाजप आता केंद्रात सत्तेत आहे. मात्र आता आश्वासन पूर्तता दूरच राहिली आमच्या पत्रांना पंतप्रधान मोदी, कृषीमंत्री साधे उत्तरही देत नाही, अशी खंत अण्णांनी व्यक्त केली आहे. तसेच आंदोलनासाठी रामलीला मैदान उपलब्ध करून दिले जात नाही, असे सांगत केंद्र सरकार द्वेष भावनेने आपल्याशी वागत असल्याचेही अण्णांनी उद्वेगाने सांगितले आहे. त्यामुळेच कदाचित अण्णा आणि अण्णांवर प्रेम करणाऱ्या राळेगणसिद्धी परिवाराने दिल्लीत आंदोलन न करता राळेगणसिद्धी मध्येच आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला असावा.