अहमदनगर Sneha Manoyatri Rehabilitation Centre: 'देव तारी त्याला कोणं मारी' या उक्तीचा प्रत्यय नुकताच अहमदनगर जिल्ह्यात आलाय. संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात सहा वर्षांपासून वेडसर म्हणून फिरणार्या आणि आशा सोडून दिलेल्या चेन्नय्यावर अहमदनगर येथील स्नेहा मनोयात्री पुनर्वसन केंद्रात औषधोपचार केले गेले. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या स्नेहाश्रद्धा फाऊंडेशननं त्याला त्याच्या तेलंगणातील घरी नेऊन सोडलंय. त्यामुळं पंधरा वर्षांनंतर चेन्नय्याला पाहून कुटुंबियांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिल्याचं पाहायला मिळालंय.
तेलंगणातून महाराष्ट्रात आला : पंधरा वर्षांपूर्वी गावात वाद झाल्यानं तेलंगणा राज्यातील चेन्नय्याला त्याच्या कुटुंबाला मारहाण झाली होती. त्यानंतर तो तेलंगणातून महाराष्ट्रात निघून आला होता. घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तो कुठेच मिळून आला नव्हता. 2017 साली तो संगमनेर तालुक्यातील साकूर गावात आला होता. येथे तो स्मशानभूमी, बसस्थानक, बिरोबा महाराज मंदिर परिसरात झोपायचा. परंतु कोणालाही त्रास देत नव्हता. प्लास्टिक बाटल्या, भंगार गोळा करून तो आपल्या पोटाची भूक भागवायचा. याच दरम्यान साकूर गावातील अशोक सोनवणे हा तरुण चेन्नय्या संदर्भात कायम सोशल मीडियावर माहिती टाकत होता. (Chennaiyya Reached Home)
स्नेहा मनोयात्री पुनर्वसन केंद्राशी संपर्क : तीन महिन्यांपूर्वी या तरुणानं अहमदनगर येथील सामाजिक कार्य करणार्या स्नेहा मनोयात्री पुनर्वसन केंद्राशी संपर्क केला. त्यानंतर प्रकल्प प्रमुख रमाकांत, हरिदास आणि इतर टीम साकूर येथे आली. अशोक सोनवणे, किशोर बनसोडे यांच्या मदतीनं चेन्नय्याला घेऊन गेले. अहमदनगर येथे सुरवातीला चेन्नय्यावर औषधोपचार केले. हळूहळू त्याला सर्व आठवत गेलं. यानंतर त्याच्यावर रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील डॉक्टर भरत वटवाणी यांच्या स्नेहाश्रद्धा फाऊंडेशन येथे पुढील औषधोपचार झाले. त्यानंतर त्याला या फाऊंडेशननं तेलंगणा राज्यातील त्याच्या कोरपोले मेदक या गावी पोहोचं केलंय. तब्बल पंधरा वर्षांनंतर चेन्नय्याला पाहून त्याचं कुटुंब आनंदानं भारावून गेलं. खळकन त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. (Sneha Manoyatri Rehabilitation Centre Shirdi)
औषधोपचार केले : संगमनेर तालुक्यातील साकूर येथे मानसिक रूग्ण आहे, असा आम्हाला फोन आला. त्यानंतर आम्ही साकूरला आलो. चेन्नय्याला घेऊन नगर येथील स्नेहा मनोयात्री पुनर्वसन केंद्रात आणलं. त्यानंतर त्याच्यावर निरज करंदीकर व दीप्ती करंदीकर यांनी औषधोपचार केले. पुढे त्याला रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील स्नेहा फाऊंडेशन येथे उपचारासाठी दाखल केलं. त्याच्यावर डॉक्टर भरत वटावणी यांनी औषधोपचार करुन मूळ गावी नेऊन सोडलं, असंं यावेळी स्नेहा मनोयात्री पुनर्वसन प्रकल्प प्रमुख रमाकांत हरिदास यांनी सांगितलंय.
हेही वाचा :