शुभांगी पाटील आज संगमनेरात बाळासाहेब थोरातांच्या घरी आल्या असताना
अहमदनगर : नाशिक पदवधीर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज प्रचारानिम्मीताने संगमनेर गाठले. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून फाटाक्याची आतीषबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. शुभांगी पाटील आशिर्वादासाठी बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. शुभांगी पाटील यांनी त्यांना आत येवु देण्याची विनंती केली. मात्र घरी कोणीच नाही असे सांगत त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही.
शुभांगी पाटलांचा प्रवेश नाकारला : बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी शुभांगी पाटील आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या होत्या. संगमनेरात जाणता राजा मैदानाजवळ बाळासाहेब थोरात यांचा सुदर्शन बंगला आहे. खालच्या मजल्यावर कार्यकर्त्यांना प्रतिक्षेसाठी खुली जागा एक हॉल आणि बाळासाहेब थोरात यांची आत केबीन आहे. एरव्ही थोरातांना भेटण्यासाठी आलेल्यांना येथे प्रवेश दिला जातो. दरम्यान, शुभांगी पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना फोन करूनही गेट उघडून त्यांना आता प्रवेश दिला गेला नाही. महाविकास आघाडीने पाठींबा देवूनही साधा पाहुणचारही शुभांगी पाटील यांचा का केला नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
राजकीय चर्चांना उधाण : मात्र, आज शुभांगी पाटील यांना गेट बाहेरच उभे केले गेले. यानंतर शुभांगी पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना प्रतिक्रीया दिली. त्या म्हणाल्या की, आज मला मला माहेरला आल्यासारखे वाटत आहे. दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे हे शुभांगी पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या उमेदवार असून देखील बाळासाहेब थोरात यांनी यावर अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेले नाही, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
बाळासाहेब थोरातांची भूमिका अस्पष्ठ : बाळासाहेब थोरात सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत, असे सांगितले जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील विरूद्ध त्यांचे भाचे सत्यजीत तांबे यांच्यापैकी कुणाचा प्रचार करावा, असा प्रश्न बाळासाहेब थोरातांपुढे उभा असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात नक्की येणार असून ते रुग्णालयात आहे लवकरच ते बाहेर येतील, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शुभांगी पाटील यांना आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे.