अहमदनगर - सुरेगाव येथील विसापूर फाट्याजवळ चौघांची गुरुवारी (दि.२०) संध्याकाळी हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सुरेगाव येथील ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे हत्याकांड स्वस्तात सोने देण्याच्या वादातून जळगाव जिल्ह्यातील चौघांनी केले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश यादव पोलीस उपअधीक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक अरविंद माने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी श्रीगोंद्यात तळ ठोकला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील नातीक कुंजीलाल चव्हाण ( वय ४०), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (वय ३५), नागेश कुंजीलाल चव्हाण ( वय १४), लिंब्या हाबर्या काळे (वय २२) या चौघांच्या हत्या प्रकरणी अक्षदा कुंजीलाल चव्हाण हिने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय उंबर्या काळे व मिथुन उंबर्या काळे (रा.सुरेगाव, ता. श्रीगोंदा) इतर पाच, सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मृत व्यक्तींनी गुरुवारी चारच्या सुमारास विसापूर फाट्याजवळ जळगाव येथील काही व्यक्तींना स्वस्तात सोन्याचे दाखवून बोलविले होते. ते ठरल्याप्रमाणे आले. त्यानंतर चौघांनी पैशांची मागणी केली. पैशाची बॅग मिळताच या व्यक्तींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर जळगावमधील आलेल्या काही लोकांनी चौघांवर चाकू हल्ला केला आणि चौघांना जागीच ठार करून जळगाव दिशेने निघून गेले, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.
ज्या ठिकाणी चौघांची हत्या करण्यात आली. त्या ठिकाणी मृत व आरोपीत झटापट झाली. जळगाव येथील एका आरोपीचे एटीएम कार्ड घटनास्थळी पडले होते. ते एटीएम कार्ड पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती आहे.