शिर्डी(अहमदनगर)- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्या आले. लॉकडाऊनमुळे बिहार राज्यातील कामगार जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकून पडले होते. राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि कोपरगांव तालुक्यातील 1 हजार 104 कामगार व त्यांचे कुटुंबिय शुक्रवारी साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने बिहारकडे रवाना झाले.यामध्ये राहाता व पिंप्री निर्मळ येथे शिक्षण घेणाऱ्या 86 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
राज्य शासनाने कामगारांचा स्वगृही परतण्याचा खर्च केला आहे. रेल्वे विभागाला एकूण 7 लाख 72 हजार 920 एवढी रक्कम कामगारांच्या तिकीटासाठी देण्यात आली आहे. रोजगारानिमित्त हे सर्व जण जिल्ह्यातील विविध तालुक्यांत वास्तव्यास होते. साईनगर शिर्डी येथून शुक्रवारी पहाटे ही रेल्वे मार्गस्थ झाली. प्रशासनातर्फे सोडण्यात आलेली ही पाचवी श्रमिक रेल्वे असून बिहारकडे जाणारी पहिलीच रेल्वे होती.
साई संस्थान प्रशासनाच्यावतीने भोजनाचे पॅकेटस, पाणी, मास्क सर्व प्रवाशांना पुरविण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशनवर पुरेशा औषधांसह वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने संबधितांची आरोग्यविषयक तपासणी केली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन या सर्वांची रेल्वेमध्ये बसायची व्यवस्था करण्यात आली होती.
लॉकडाऊनमुळे शिर्डी व परिसरात अडकून पडलेल्या 5731 कामगारांना यापूर्वीच त्यांच्या मूळ गावी रेल्वेने पाठविण्यात आले आहे.स्वगृही परत जाण्याचा आनंद सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. लॉकडाऊन असतानाही कामगारांना मूळ गावी परतण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या तालुका प्रशासनाला आणि रेल्वे प्रवासाचे भाडे अदा करणाऱ्या राज्य शासनाला कामगारांनी मनापासून धन्यवाद दिले.