शिर्डी - दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन-पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. याचा शिर्डीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. शिवसैनिकांनी दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला उलटे करत जोडे मारो आंदोलन केले.
'दानवे यांचे वक्तव्य राष्ट्रद्रोही'
शिर्डी नगरपंचायतीच्या प्रांगणात शिवसेनेच्या वतीने दानवेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच याच वेळी दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा आणून त्याला शिवसैनिक आणि महिला सेनेने जोडे मारत आंदोलन केले. आम्ही शेतकरी असून दानवे यांचे वक्तव्य राष्ट्रद्रोही आहे. भाजपात जोपर्यंत असे शेतकरी विरोधक वक्तव्य करणारे मंत्री आहेत, तोपर्यंत त्या पक्षाचे काही खरे नाही, असे यावेळी शिवसैनिकांनी म्हटले.
'दानवे शेतकरीविरोधी'
दानवे शेतकरीविरोधी असून त्यांना त्याची शिक्षा मिळावी, अशा घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. तर कडक पोलीस बंदोबस्त असतानाही सेनेने दानवेंचा पुतळा आणून आंदोलन केले. त्यामुळे शिर्डी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलक शिवसैनिक पोलिसांनी ताब्यात घेतले. राहता तालुका शिवसेना अध्यक्ष कमलाकर कोते, उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे, तालुकाप्रमुख संजय शिंदे, शिर्डी शहर प्रमुख सचिन कोते अन्य शिवसैनिकाना पोलिसांनी ताब्यात घेतले.