अहमदनगर- निवडणुका संपल्यानंतरही अहमदनगर जिल्ह्यातील दोन पारंपरिक विरोधकांमधील राजकीय लढाई सुरूच असल्याचे दिसून येत आहे. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विजयाबद्दल लावलेले बॅनर मध्यरात्री अज्ञातांनी फाडल्याने हा वाद पुढील काळात आणखी चिघळणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात शिवसेना भाजपचे बॅनर फाडण्याच्या प्रकार घडल्याने निवडणूक निकालानंतरही राजकीय संघर्ष सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शहरानजीक असलेल्या घुलेवाडीत नवनिर्वाचित खा. डॉ. सुजय विखे पाटील आणि खा. सदाशिव लोखंडे यांच्या विजयाबद्दल छायाचित्र असलेले बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर मध्यरात्री अज्ञातांनी फाडले. या घटनेचा शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.
बॅनर फाडल्याचे समोर आल्यानंतर भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी घुलेवाडी गाव बंद ठेवत नाशिक-पुणे महामार्गावर आंदोलन करून निषेध व्यक्त केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज जरी हा वाद मिटला असला तरी येत्या विधानसभा निवडणुका पर्यंत हा राजकीय वाद आणखी चिघळणार असे दिसत आहे.