शिर्डी : Shirdi Sitaphal Special Story साईबाबांच्या शिर्डीतील सचिन गोंदकर या युवकानं दिल्लीहून एमएस्सी ॲग्री व पीएचडी शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर घरच्यांनी नोकरी करण्याचा किंवा आपल्या वडिलोपार्जित चालत असलेल्या लॉजिंग आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय सांभाळण्याचा सल्ला दिला. मात्र आपण एमएस्सी ॲग्री शिक्षण घेतलं असल्यानं नोकरी किंवा व्यवसाय करायचा नाही तर आपल्या वडिलोपार्जित शेतीतच आधुनिकतेता वापर करत शेती करण्याचा ठाम निर्णय सचिननं घेतला. शेतात पारंपरिक पध्दीतीनं घेतल्या जात असलेल्या गहू, सोयाबीन, मका या पिकांना चांगला बाजार भाव मिळत नसल्यानं कुठली पिकं घेतल्यास अधिक उत्पन्न मिळेल याचा अभ्यास सचिनने सुरू केला.
आई वडलांनीही दिला पाठींबा : सचिननं आपली आई उषा आणि वडील सोपानराव यांच्याबरोबर चर्चा केली. भुसार पिकांची शेती आपण आजपर्यंत करत आलोय. मात्र यातून सर्व खर्च वजा करत नफा ही शिल्लक राहात नाही. यामुळं आपण आता फळबाग शेतीकडं वळालो पाहिजे असं त्यानं सुचवलं. आई वडिलांनीही सचिनला फळ बाग शेती करण्यासाठी होकार दिला. यानंतर सचिननं आपल्या शेतीचे माती परीक्षण केल्यानंतर आपल्या शेतीत सीताफळ बाग चांगली फुलेल आणि सीताफळाला बाजारभावही चांगला मिळत असल्याचं सचिनच्या लक्षात आल्यानंतर कुठल्या जातीच्या सीताफळाची लागवड करायची यावर शोध सुरू केला.
सीताफळाच्या रोपांची लागवड : सध्या बाजारात गोल्डन जातीच्या सीताफळाला चांगली मागणी असल्याची माहिती मिळल्यानंतर सचिननं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे गोल्ड जातीची सीताफळाची 380 रोपं घेतली. आपल्या एक एकर क्षेत्रात 8 बाय 15 अंतरावर त्याची 2017 साली लागवड केली. ही बाग उभी करण्यासाठी साधारणतः 40 हजार रुपय खर्च आला होता. सीताफळाच्या रोपांची लागवड केल्यानंतर झाड मोठे होऊन त्याला फळ येण्यास साधारण तीन वर्षांचा कालावधी जाणार असल्यानं या बागेत, शेवगा, भोपळा असं आंतर पीक घेऊन या आंतर पिकांच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न सचिननं घेतलं. सीताफळ बाग उभी करण्यासाठी आलेला खर्च आंतर पिकांच्या उत्पन्नातूनच निघाला असल्याचं सचिन सांगतो.
सीताफळ शेती परवडतेय : सचिननं लावलेल्या सीताफळ बागेत मागच्या वर्षीपासून झाडांना फळं येण्यास सुरू झाली. मागील वर्षी 70 ते 80 रुपये प्रति किलो भाव मिळाला होता. तर साधारण 3 टन माला निघाला होता. मागील वर्षी सर्व खर्च वजा करत 4 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला होता. झाडांना फळं येण्याचं हे दुसरं वर्ष असून यावर्षी 2 ते 3 टन माल निघण्याचा अंदाज असून एका फळाचं वजन 500 ते 600 ग्राम असल्यानं सीताफळाला थेट गुजरात राज्यातून मागणी आली. आता 60 ते 70 रुपय प्रति किलो भाव मिळत असल्याचं सचिन म्हणाला आहे. यावर्षी साधरण सगळा खर्च वजा करत 3 ते 4 लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहणार असल्यानं सीताफळ शेती परवडतेय.
आम्हाला नाही जमले ते मुलाने करून दाखवले : गहू, सोयाबीन, मका या पिकांची लागवड आम्ही या आधी शेतात करत होतो. काबाडकष्ट करूनही हातात काहीच राहत नव्हते. मात्र सचिन दिल्लीहून शिक्षण घेवून घरी आला त्यावेळी आम्ही त्याला नोकरी किंवा घरचे लॉजिंग आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय सांभाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र सचिननं घेतलेलं शिक्षण आणि जिद्द यातून उभी केलेल्या सीताफळाच्या बागेतून चांगले उत्पन्न आता आम्हाला मिळतंय. जे आम्हाला नाही जमलं ते मुलाने करून दाखवलं हे पाहण्यासाठी सचिनचे वडील आज या जगात नाहीत. ते आज असते तर त्यांना खुप आनंद झाला असता असंही यावेळी सचिनचा आई उषा गोंदकर म्हणाल्या आहेत.
हेही वाचा :
- नोकरी सोडून शेती करण्याचा धाडसी निर्णय, ऊस लागवड नव्हे फळभाजी विक्रीतून रोज १५ ते २० हजारांची कमाई!
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2023 ; भाजपाच्या संसदीय समितीची आज बैठक, तर काँग्रेसनं लोकसभेत दिला स्थगन प्रस्ताव
- भाजपाच्या संसदीय दलाची बैठक सुरू; तीन राज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीवर चर्चा होण्याची शक्यता