अहमदनगर : शिर्डी साईबाबा संस्थानच्या बँकातील ठेवींच्या बरोबरच दानात आलेल्या नाण्यांचा बँकेकडील साठाही वाढत आहे. नाणे समस्याने शिर्डीतील सर्वच राष्ट्रीयकृत बँका मेटाकुटीला आल्या आहेत. चार बँकानी तर नाण्यांच्या धास्तीने संस्थानच्या ठेवीच्या मोहावरही पाणी सोडले आहे. यामुळे साईसंस्थान लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील अन्य बँकामध्ये खाते उघडणार आहे.
एकूण 2600 कोटींच्या ठेवी : नेवासा तालुक्यातील पाचेगावच्या युनियन बँकेचा व औरंगाबादच्या कॅनरा बँकचा संस्थानकडे यासाठी प्रस्ताव आला आहे. शिर्डीतील डझनभर व नाशिकच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत संस्थानचे खाते आहे. यात 2600 कोटींच्या ठेवी आहेत. साईसंस्थान आठवड्यातून दोनदा देणगीची मोजदाद करते. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या बँकेला निमंत्रित करण्यात येते. दानात निघालेले पैसे व नाणी मोजून बँक घेवून जाते. या रक्कमा बँकेत बचत व ठेवीच्या रुपात ठेवण्यात येतात. प्रत्येक बँकेकडे सरासरी दिड-दोन कोटींची नाणी साचली आहेत. बँकांना नाणी ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. शिर्डीतील छत्रपती कॉम्प्लेक्समध्ये कॅनरा बँक पहिल्या मजल्यावर आहे. आतापर्यंत नाण्यांनी गच्च भरलेल्या त्यांच्या स्ट्राँगरूममध्ये किमान तीन ट्रक नाणी असतील. या अवजड नाण्यांमुळे खालील दुकानदारांना छत कोसळण्याची भीती वाटत आहे.
बँकेला द्यावे लागते व्याज : नाणी बँकेत पडून असतात. मात्र, त्यावर साई संस्थानला तसेच रक्कम बँकत रोखीने ठेवल्याबद्दल आरबीआयला व्याज द्यावे लागते. या नाण्यांवर प्रत्येक बँकेला वर्षाकाठी पंधरा ते वीस लाख रुपये खर्च येतो. नाण्यांसाठी कापडी पिशव्यांचा खर्चसुद्धा बँकानाच करावा लागतो. आता तर संस्थानने पैसे मोजणी मशिनही बँकाकडूनच देणगी रूपात मागितल्याचे कळते. आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटकातील भाविक मोठ्या प्रमाणावर नाणी अर्पण करतात. या नाणे समस्यावर शिर्डीतील सर्व बँकानी एकत्र येऊन यापूर्वी एक अयशस्वी लढाही दिला आहे. आरबीआय प्रत्येक बँकेला ग्राहकाकडून नाणे स्वीकारण्याची सक्ती करते. तशी बँकेकडील अतिरीक्त नाणी आरबीआयने स्वीकारली तरच हा प्रश्न मार्गी लागेल. दरम्यान, साईबाबा संस्थान बँकेतील नाणे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले आहे.