शिर्डी : साई भक्तांचे दर्शन व येथील वास्तव्य आनंददायी करणे आणि साई संस्थान कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या समस्या मार्गी लावण्यास आपले प्राधान्य असेल. मात्र भाविकांशी गैरवर्तन करणारांची गय केली जाणार नाही, असा इशारा साई संस्थानचे प्रभारी सीईओ राहुल जाधव (Shirdi Sai Trust CEO Rahul Jadhav) यांनी दिला. साई संस्थानातील प्रत्येक भक्तनिवासात किती खोल्या रिकाम्या आहेत हे भक्तांना लवकरच ऑनलाईन कळू शकेल, बसस्थानक, रेल्वेस्थानक, विमानतळ व गर्दीच्या ठिकाणी यासाठी डिस्प्ले लावण्यात येतील असेही जाधव यांनी सांगितले.
सेवेकरी पद्धत पुन्हा सुरू करण्यासाठी विषय मांडू : साईसंस्थानचा कर्मचारी सेवा प्रवेश नियम व आकृतीबंधाचा विषय त्यातील त्रुटी दूर जरून तातडीने मार्गी लावण्यात येईल. यामुळे कालबद्ध पदोन्नती, वेतनश्रेणीसह अनेक प्रश्न सुटतील. ५९८ कामगारांना एकत्रित मानधन देता येईल, यानंतर संस्थानात किमान एक हजार कर्मचाऱ्यांची पदभरती करता येईल. अकुशल कामगारांच्या परीक्षा घेवून कुशल करणे, प्रत्येक विभागाची एसओपी तयार करणे, साईसंस्थानच्या रूग्णालयात डॉक्टर्स व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, डॉक्टरांना योग्य मोबदला व सन्मान देवुन चांगले डॉक्टर्स आणण्यासाठी प्रयत्न करू. तसेच सेवेकरी पद्धत पुन्हा सुरू करण्यासाठी समितीसमोर विषय मांडू, असे सीईओ जाधव यांनी सांगितले.
ग्रामस्थांशी सुसंवाद राखला जाईल : सीईओचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांसमोर राहुल जाधव यांनी आपल्या कामाजाची पद्धत भक्ताभिमुख व पारदर्शी असेल असे स्पष्ट केले. महुसल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातुन राज्यसरकारचे असलेले पाठबळ व साईसंस्थानच्या समितीचे अध्यक्ष प्रधान जिल्हा न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची असलेली अत्यंत सकारात्मक भुमिका यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करतानाच ग्रामस्थांना योग्य सन्मान देवून त्यांच्याशी सुसंवाद राखला जाईल, असे जाधव यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली : कर्मचाऱ्यांची क्षमता, पात्रता व गुणवत्ता अभ्यासून दर तीन वर्षांनी बदली करण्यात येईल. त्यासाठी लवकरच सॉफ्टवेअर विकसीत करण्यात येईल. संस्थान रूग्णालयाचा कारभार गतीमान करण्यासाठी पाच कोटी रूपयांचे संगणक व सॉफ्टवेअर खरेदी करण्यात आले आहेत. बोगस, भाविकांना फसवणाऱ्या व विनापरवानगी आरती, दर्शन लाईव्ह करणाऱ्या जवळपास सव्वाशे वेबसाईट, युट्युब चॅनलवर पोलीसात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दोन महिन्यात दर्शनरांग व पुढील शैक्षणिक वर्षापासुन शैक्षणिक संकुल इमारत सुरू होईल, अशी माहितीही जाधव यांनी दिली.