शिर्डी (अहमदनगर) - देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरातील दर्शनरांगेचे आधुनिकीकरण लवकरच केले जाणार आहे, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली. ते 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होते.
'वूडन युनिक वॉक-वे' निर्माण करण्याचा मानस -
"सबका मालिक एक"चा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आज देश-विदेशातून कोट्यावधी भाविक शिर्डीत येत असतात. साईबाबांच्या समाधी मंदिरात आल्यानंतर भाविकांना सध्या मंदिरात असलेल्या लोखंडी बॅरिगेट दर्शनरांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. ही लोखंडी बॅरिगेटिंग मंदिरात चांगली दिसत नसल्याने साईबाबा संस्थानचा आता साई समाधी मंदिरात प्राचीन मंदिरे अथवा राजवाड्यांच्या धर्तीवर 'वूडन युनिक वॉक-वे' निर्माण करण्याचा मानस आहे. त्यामुळे साई मंदिराचे संपूर्ण स्वरूप पालटणार असून प्राचीन व आलिशान वाड्याचे रूप त्यातून मंदिराला लाभेल, असा विश्वास साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - नोबेल शांती पुरस्कार विजेते तिबेट धर्मगुरु दलाई लामा यांना टोचवली कोरोना लस
1 कोटी रुपये खर्च येणार -
लोखंडी दर्शन रांगेऐवजी "वूडन युनिक वॉक-वे" लाकडी रेलिंग दर्शनरांग बनवण्यासाठी साधारणत: 80 लाख ते 1 कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी काही भाविकही हा खर्च करण्यासाठी तयार असल्याचा या बाबतचा प्रस्ताव साई संस्थांच्या समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे. येत्या दोन तीन महिन्यात साईसमाधी मंदिरातील दर्शनरांगेत बदल करण्यात येणार असल्याची माहितीही कान्हूराज बगाटे यांनी दिली.
तर याबाबत आंतरराष्ट्रीय किर्तीचे रचनाकार नितीन देसाई यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी नक्षीकाम असलेले लाकडी रेलिंग त्याचे संकल्पचित्र बनवले आहे. दरम्यान, साई मंदिरात भाविकांनी प्रवेश केल्यानंतर राजवाड्यात अथवा प्राचीन मंदिरात प्रवेश केल्याचा वेगळ्या पद्धतीचा अनुभव भाविकांना येणार काही दिवसात मिळणार आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! वडील आणि आजोबांची हत्या करून तरुणाची आत्महत्या