शिर्डी : शिर्डी साईबाबांच्या ( Shirdi Saibaba ) दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पुर्वी दर्शन रांगेत साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांन कढून गंधाचा टिळा लावुन स्वागत केले जात होते. मात्र कोरोनाकाळात हा गंधाचा टिळा बंद करण्यात आला होता. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणे गंधाचा टिळा लावुन भाविकांचे मंदिरात स्वागत केले जात असल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहण्यास मिळत आहे.
प्रत्येक साईभक्तांचं स्वागत गंधाचा टिळा लावून करण्याचा निर्णय : साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक साईभक्तांचं स्वागत गंधाचा टिळा लावून करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला होता. त्यानुसार साईबाबांच्या दर्शनासाठी येणा-या प्रत्येक साईभक्तांचे साई मंदिरात गंध टिळा लावून स्वागत करण्यात येत होते. परंतु गेल्या दोन वर्षापुर्वी म्हणजेच सन 2020 साली संपूर्ण जगभरात व देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला. या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारत सरकार व राज्य शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये धार्मिक स्थळे, सामाजिक ठिकाणी गर्दी होऊ नये. असे निर्देश देण्यात आलेले होते.
साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले : दिनांक 17 मार्च 2020 रोजी पासुन साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरीता बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानच्यावतीने घेतला होता. त्यानंतर सन 2021 मध्ये कोरोना विषाणुच्या प्रमाणात घट झाल्याने राज्य शासनाच्यावतीने कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आल्यामुळे दिनांक 7 ऑक्टोंबर 2021 पासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. तसेच कोरोना विषाणुच्या प्रतिबंधत्माक उपाय म्हणून बंद केलेल्या सोयीसुविधा संस्थानच्या वतीने टप्याटप्याने खुली करण्यात आल्या. त्याच अनुषंगाने आज साईबाबांच्या पहाटेच्या काकड आरतीपासुन पुर्वीप्रमाणे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गंधाचा टिळा लावून स्वागत करण्याचा शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.