शिर्डी - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्व व्यवहार आणि धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले. त्यामुळे १७ मार्चपासून शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिरही बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर बंद असतानाही ३ एप्रिलपर्यंत साईभक्तांनी ऑनलाईन पद्धतीने १ कोटी ९० हजार २०१ रुपयांचे दान संस्थानला दिले आहे.
संपूर्ण जगभरात साईबाबांचे भक्त आहेत. दररोज लाखो रुपयांचे दान दानपेटीत टाकत असतात. आता कोरोनामुळे मंदिर बंद आहे, तरीही भक्तांनी दान करण्याचे थांबवलेले नाही. ऑनलाईन पद्धतीचा वापर करुन अनेक भक्तांनी घरबसल्या दान केले आहे. दरम्यान, जोपर्यंत शासनाकडून लॉकडाऊन उठवण्याचे आदेश येत नाहीत तोपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी याबाबत माहिती दिली.