शिर्डी (अहमदनगर) Shirdi Sai Baba Darshan Pass : साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांना झटपट साईबाबांचे दर्शन करून परतण्याची घाई असते. अशाचवेळी काही एजंट त्यांची फसवणूक करून लुटमार करत असल्याचे प्रकार समोर आले होते. या संदर्भात काही भाविकांनी साईबाबा संस्थानकडे लेखी तक्रारी देखील केला आहे. त्यामुळे आता भाविकांना स्वतः पास काढावा लागणार आहे. यासोबत मोबाईल नंबर आणि आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. साईबाबांचा आरती व दर्शन पास घेण्यासाठी येणार्या सर्व भाविकांना आपले आधारकार्ड 'ऑनलाईन रजिस्टर' करावे लागणार आहे. साईबाबा संस्थानच्या www.sai.org.in या ऑनलाईन पोर्टलवर सामान्य भाविकांना पेड दर्शन आणि आरती पासची आगाऊ बुकिंग करता येणार असल्याचेही साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर म्हणाले आहेत.
पेड दर्शनपास व आरतीपास काढण्याची पद्धत: साईबाबा संस्थानचे आजी माजी विश्वस्त, शिर्डीतील प्रतिष्ठित नागरिकांच्या शिफारशीनुसार साई संस्थानच्या जनसंपर्क कार्यालया मार्फत देण्यात येणाऱ्या 'व्हीआयपी' दर्शन व आरती पासेससाठीही हा नियम लागू करण्यात आला आहे. साईबाबांचा दर्शनाचा 'व्हीआयपी पास' घेण्यासाठी एकाच व्यक्तीचे आधारकार्ड व इतर ओळखपत्र लागणार आहे तर इतरांचे नाव अनिवार्य असणार आहे. मात्र, आरतीचा पास घेतेवेळी सर्व सदस्यांचे ओळखपत्र अनिवार्य असणार असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी दिली आहे. तसेच ऑनलाईन दर्शनपास कोटा प्रतितास पाचशे वरून एक हजार करण्यात आला आहे. www.sai.org.in या अधिकृत वेबस्थळावर पेड दर्शनपास व आरतीपास उपलब्ध करण्यात आले आहे.
तर भाविकांची लूट थांबेल: सर्व सामान्य भाविकांना विना पास थेट दर्शन रांगेतून नेहमीप्रमाणे साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार असल्याचेही शिवाशंकर म्हणाले आहे. साईबाबा संस्थानने व्हीआयपी पास संदर्भात घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून या निर्णयामुळे व्हीआयपी पासच्या माध्यमातून भाविकांची होणारी लूट काही प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीवर आहे. हे विचारात घेऊन भाविकांना साईबाबांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी संस्थानकडून दर महिन्याला नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. व्हीआयपी पास किंवा आरती पास काढण्यासाठी भाविकांनी एजंटच्या भानगडीत न पडता संस्थानच्या अधिकृत वेबसाईटचा वापर करावी, असे आवाहन संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा:
- Sai Sansthan on Devotees Fraud : भाविकांसाठी आनंदाची बातमी! या योजनांमुळं बसणार साईभक्तांच्या फसवणुकीला आळा
- Saibaba Sansthan Trust : साई संस्थान देशभरात उभारणार साईबाबांची मंदिरं; निर्णयाला शिर्डीकरांचा विरोध
- Guru Purnima in Shirdi: गुरुपौर्णिमेच्या शुभमुहर्तावर अमेरिकेतील टेक्सास येथील साईभक्ताने केला साईचरणी 20 लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण