अहमदनगर (शिर्डी) Diwali Festival 2023 : दिवाळी सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं दिवाळी सण साईबाबा मंदिरात साजरा करण्यात येतोय. आज दिवाळी असल्यानं घरोघरी लक्ष्मीपूजन (lakshmi Ganesh Puja) केलं जातं. त्याचबरोबर साईबाबांच्या मंदिरात देखील श्री गणेश पूजन, लक्ष्मी, कुबेर, सरस्वती पूजन करण्यात येते. साई मंदिरात लक्ष्मी पूजनादरम्यान सायंकाळी काही काळ साई समाधीचं दर्शन बंद असणार असून मुखदर्शन सुरू राहणार आहे.
अश्या पद्धतीनं होणार लक्ष्मी कुबेर पूजन : साईबाबा मंदिरात साडेचार ते पावणे सातपर्यंत भाविकांना मुखदर्शन सुरू राहणार आहे. तर साई समाधीचं दर्शन बंद असणार आहे. सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास साईबाबा मंदिरात लक्ष्मीपूजनाची तयारी होईल. त्यानंतर 5 वाजेपासून साईबाबा समाधी मंदिरात लक्ष्मीपूजनाला सुरुवात होईल. साईबाबा संस्थांनच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते सर्वात प्रथम श्रीगणेश पूजन होईल, त्यानंतर लक्ष्मी, कुबेर, सरस्वती पूजन पार पडणार आहे. देशभरातील भाविकांना लक्ष्मी प्राप्त व्हावी, यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीनं संकल्प केल्या जातो. त्यानंतर साईबाबा संस्थानचा सर्व लेखाजोखा असलेल्या वहीचं पूजन आणि शिर्डी ग्रामस्थांनी पूजेसाठी दिलेल्या पैशांच्या पाकिटांची पूजा करण्यात येते. साईबाबा संस्थांकडं असलेल्या सोने-चांदी, हिरेमोती यांची देखील पूजा करण्यात येते. 6 वाजता साईबाबांच्या धुपारतीला सुरूवात होणार आहे. साईबाबांची धुपारती संपल्यानंतर 6 वाजून 45 मिनिटानं साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिर पुन्हा नियमित सुरू होणार आहे.
साईबाबांनी पाण्यानी दिवे लावल्याची अख्यायिका : संपूर्ण जीवन फकीरी अवस्थेत व्यतित करणाऱ्या साईबाबांनी द्वारकामाईत अनेक चमत्कार केल्याचा दावा भाविकांकडून करण्यात येतो. यातीलच सर्वात महत्त्वाचा चमत्कार म्हणजे दिवाळीच्या दिवशी साईबाबांनी पाण्यानी दिवे लावले होते, असंही भाविक सांगतात. त्यामुळे दिवाळीला साईबाबांच्या शिर्डीत अनन्य साधारण महत्त्वं आहे. दिवाळी निमित्तानं साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून आज हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले. शिर्डीच्या साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 साली समाधी घेतली. त्यानंतर 1922 साली शिर्डी साईबाबा संस्थानची स्थापना झाली आहे. साईबाबा संस्थानची स्थापना झाल्यापासून साईबाबांच्या समाधी मंदिरात इतर उत्सवाप्रमाणं दिवाळी सण देखील पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साईबाबा संस्थानच्या वतीनं साजरा करण्यात येतो.
हेही वाचा -