शिर्डी: येथे श्रीरामनवमी उत्सवाची सुरुवात 1911 मध्ये साईबाबांचे अनुमतीने करण्यात आली. तेंव्हापासून प्रतीवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. उत्सवात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून दर्शनाची व्यवस्था सुखकर व्हावी याकरिता तसेच उन्हापासून संरक्षणासाठी मंदिर परिसरात सुमारे 97 हजार चौ.फुट मंडप उभारण्यात आला आहे. तसेच साईभक्तांच्या अतिरिक्त निवासव्यवस्थे करीता साईबाबा भक्तनिवासस्थान 500 रुम सोबत साईधर्मशाळा याठिकाणी सुमारे 32 हजार चौ.फुट बिछायत मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. यात विद्युत, पाणी पुरवठा, स्वच्छतागृह व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.
मुंबई व परिसरातून पालखी सोबत येणा-या पदयात्रींच्या निवा-याची सोय व्हावी यासाठी संस्थानच्या वतीने मुंबई ते शिर्डी महामार्गावर ठिकठिकाणी सुमारे 1 लाख 17 हजार चौ.फुट कापडी मंडप उभारण्यात आला आहे. यात विद्युत व पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे. कोपरगांव येथील वाल्मीकराव कातकडे यांनी विनामुल्य 10 पाण्याचे टॅकर चालकासह दिलेले असून याकरीता संस्थानच्या वतीने इंधन खर्च करण्यात येत आहे.
शिर्डी येथे पालख्या आल्यानंतर पदयात्रींची साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सिन्नर ते शिर्डी या मार्गावर पदयात्रींना आवश्यकतेनूसार तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच गुरुस्थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा, दर्शनरांग, नविन भक्तनिवासस्थान, साईआश्रम, साईप्रसादालय व मारुती मंदिराशेजारील साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु राहणार असून या ठिकाणी तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहीका ही तैनात करण्यात आलेल्या आहेत.
भाविकांना साई दर्शनासाठी साईआश्रम, साईबाबा भक्तनिवासस्थान, साई धर्मशाळा व श्री साईप्रसादालय आदि ठिकाणाहुन जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी ठिक ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत. आवश्यकते नुसार ते आणखी वाढवण्याची निर्णय संस्थान ने घेतला आहे. समाधी मंदिर व परिसरात भुवनेश्वर येथील दानशूर साईभक्त सदाशिब दास यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट व शिंगवे येथील ओम साई लाईटींग डेकोरेटर्स निलेश नरोडे यांच्या वतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.