अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २९ एप्रिलला होत आहे. येथील प्रचाराची सांगता शनिवारी २७ एप्रिलला झाली. या निवडणुकीत शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही रिंगणात आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडल्यानंतर २३ एप्रिल ते २७ एप्रिल या ४ दिवसांत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेनंतर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत नगर आणि शिर्डी मतदारसंघाच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने दोन्हीकडे एकत्रच जाहीर सभा, प्रचार फेऱ्या आयोजित केल्या जात असत. मात्र, यंदा प्रथमच या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होत असल्याने राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना तसेच समर्थकांनाही दोन्हीकडील प्रचार नियोजनाला पुरेसा वेळ मिळाला.
शिर्डीमध्ये शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे याच्यांसह अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही रिंगणात आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान आणि अन्य १६ उमेदवारही रिंगणात उभे आहेत. मात्र, खरी लढत लोखंडे-कांबळे-वाकचौरे, अशी मानली जात आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि नितीन गडकरी यांच्या जाहीर सभा झाल्या. तर आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी, शरद पवार, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांनी शिर्डीत सभा घेतल्याने येथील वातावरण ढवळून निघाले.