अहमदनगर - विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. गेल्या ५ वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडल्याने शिर्डी विधानसभा मतदारसंघात राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. काँग्रेसच्या आमदारकीचा आणि विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देऊन राधाकृष्ण विखे पाटील भाजपत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचा पराजय करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. शिर्डी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांसमोर कडवं आव्हान देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबेची निवड करण्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मागील निवडणुकीत विखे पाटील मोदी लाटेतही ७० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. शिवसेना उमेदवार अभय शेळके यांचा त्यांनी पराभव केला. विखे पाटील आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विखे पाटलांनी भाजप प्रवेश केल्यानंतर शिर्डी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त नावाला शिल्लक राहिली आहे. मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने सत्यजित तांबे यांचे नाव सध्या चर्चेत आहे. तांबे यांनी शिर्डी विधानसभेच्या उमेदवारीसाठी मुलाखतही दिली. शिर्डी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांसमोर कडवं आव्हान देण्यासाठी तांबेची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिर्डी मतदारसंघात पूर्णत: खिळखिळी झाल्याने विखेंचं पारड जड असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढले. यावेळी भाजप-शिवसेना युती झाली, तर ही जागा शिवसेनेकडे असल्याने विखे पाटील तिकीट मिळवण्यासाठी यातून कसा मार्ग काढतात ते पाहणे ही महत्त्वाचे ठरणार आहे. युती झाली नाही, तर मात्र विखेंसमोर शिवसेनेचे मोठे आव्हान असणार आहे.
शिर्डी मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न
- साईबाबा संस्थानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याची मागणी.
- शिर्डीतील वाढलेली गुन्हेगारी.
- कोणतेही मोठे उद्योग नसल्याने बेरोजगारीची वाढती समस्या.
- निळवंडे लाभधारकांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी अपूर्ण कालव्यांची कामे मार्गी लावणे.
- शिर्डीतील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन प्रकल्प आणणे.
- शिर्डी विमानतळ येथे सुविधा उपलब्ध करुन देणे.
शिर्डी विधानसभा २०१४ मध्ये पडलेली मत
- राधाकृष्ण विखे पाटील (कॉंग्रेस) - १ लाख २१ हजार ४५९ मते
- अभय दत्तात्रय शेळके पाटील ( शिवसेना ) - ४६हजार ७९७ मते
- राजेंद्र गोदकर पाटील (भाजप) - १७ हजार २८३ मते
लोकसभा निवडणुकीत शिर्डी विधानसभा मतदार संघात विविध पक्षांना झालेले मतदान
- सदाशिव लोखंडे (शिवसेना) - ८८६४३
- भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) - ४९३४४
- संजय सुखदान (वंचित)- १४१४०