अहमदनगर - साईबाबांच्या जन्मभुमिचा मुद्दयावर आता शिर्डी आणि पंचक्रोशीतील नागरिक आक्रमक झाले आहेत. हा मुद्दा निकाली काढण्यासाठी रविवारपासून शिर्डी आणि पंचक्रोशी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय गुरूवारी झालेल्या शिर्डी ग्रामस्थांनी बैठकीत घेतला आहे. रविवारपासुन बेमुदत शिर्डी बंद सुरू होण्यापूर्वी शनिवारी सायंकाळी शिर्डीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय उद्या शुक्रवारी पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांनाही या बंद मध्ये सहभागी करून घेण्याचा शिर्डीकरांचा प्रयत्न आहे. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल टाळण्यासाठी दोन दिवस अगोदर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शिर्डीच्या इतिहासात प्रथमच शिर्डी बेमुदत बंद होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील साईबाबांच्या जन्मस्थळासाठी १०० कोटींचा विकास आराखडा राबवला जाईल अशी, घोषणा मागील आठवड्यात केली होती, त्याचे तीव्र पडसाद शिर्डीत आणि भाविकांमध्ये उमटले़ आहेत. पाथरीला निधी देण्यास शिर्डीकरांची मुळीच हरकत नाही. मात्र साई जन्मस्थान म्हणुन त्याची ओळख निर्माण केली जाते याला शिर्डीकरांचा आक्षेप आहे. साईबाबांनी आपले नाव, गाव, जात, धर्म कधीही सांगितला नाही, यामुळेच ते जगभर सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणुन ओळखले जातात. यापूर्वीही साईबाबा व त्यांच्या आई-वडिलांविषयी अनेक बोगस दावे करण्यात आले आहेत. या तथाकथित जन्मस्थानाच्या दाव्याने बाबांवर एका जातीचे, धर्माचे लेबल लावण्याचा प्रयत्न आहे. यामुळे बाबांच्या मुळ शिकवणुकीला व त्यांच्या प्रतिमेलाच धक्का पोहचणार आहे. यामुळे शिर्डीकरांचा जन्मस्थानाच्या दाव्याला आक्षेप आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साईभक्त आहे त्यांना चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांच्याकडुन असा उल्लेख झाला असावा असे शिर्डीकरांना वाटते, त्यामुळे त्यांची भेट घेवून त्यांना वस्तुस्थिती सांगण्याचाही ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. यापुर्वीही राष्ट्रपतींनी साई समाधी शताब्दीत जन्मस्थळाचा उल्लेख केला होता. त्यावर शिर्डीकरांनी थेट दिल्लीत जावुन वस्तुस्थीती त्यांच्या समोर मांडली होती. सायंकाळी शिर्डी ग्रामस्थांच्या शिर्डी नगरपालीकेत झालेल्या बैठकीला नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभवन, शिवाजी गोंदकर, अभय शेळके, विजय कोते, सुधाकर शिंदे, नितीन उत्तम कोते, रविंद्र गोंदकर, सुजित गोंदकर, रमेश गोंदकर, दिपक वारूळे, गजानन शेर्वेकर,तुकाराम गोंदकर, सुनील वारूळे, गणेश कोते, गणीभाई पठाण, जमादार इनामदार, तान्हाजी गोंदकर, सुरेश मुळे आदींची उपस्थीती होती.