अहमदनगर (शिर्डी) - कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिककाळ बंद असलेले शिर्डी विमानतळ आज 10 ऑक्टोंबर पासून सुरू झाले आहे. साईबाबांचे मंदिरे सुरू झाल्यानंतर विमानसेवा सुरू करावी अशी मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर विमानतळ विकास प्राधिकरणाने हे विमानतळ नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहील्याच दिवशी स्पाईस जेटची चेन्नईहुन फ्लाईट येणार
शिर्डी साईबाबा अंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरुवातीला स्पाईस जेट, इंडिगो एअरलाईन्सची सेवा दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई ठिकाणासाठी असणार आहे. आज शिर्डी विमानतळावर पहील्याच दिवशी स्पाईस जेटची चेन्नईहुन फ्लाईट येणार असून, त्यात सुमारे 174 प्रवासी असनार आहे. तर चेन्नईकडे जाणाऱ्या विमानातून 58 प्रवासी जातील. त्यानंतर मंगळवारपासून दिल्ली आणि चेन्नईची नियमीत विमानसेवा सुरु होणार आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील इतर शहरातूनही विमाने शिर्डीला येणार आहेत अशी माहिती विमानतळ विकास प्राधिकरणाने दिली आहे.
विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवली -
शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एमएडीसीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. आधी या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची लांबी २५०० मीटर होती. आता ती ३२०० मीटर इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे बोईंग, एअरबससारख्या मोठ्या विमानांचेही लँडिंग होऊ शकणार आहे.
हवामान खात्याकडून लवकरच लँडिंग साधनसामग्री -
नाईट लँडिंग सुविधेसाठी कॅट १ अप्रोच लाईट्स रन वे लाईट्स बसविण्यावर ९ कोटी ८५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच हवामान खात्याकडून लवकरच लँडिंग साधनसामग्री उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी एमएडीसीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी दिली आहे.
हेही वाचा - प्रियंका गांधींच्या संघर्षाने दिल्लीही झोपली नसावी, रोखठोक'मधून राऊतांचा भाजपवर हल्ला