शिर्डी - साईभक्तांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेले काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ दृश्यमानते अभावी गेल्या 27 दिवसापासून बंद होते. आता विमानतळावर दृश्यमानता वाढवण्यासाठी उपाययोजना केल्याने उद्यापासून (बुधवार) विमानतळ पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दिपक शास्त्री यांनी दिली.
हेही वाचा - शेतकरी, शेतमजूरसह महिलांच्या विविध प्रश्नांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन
1 ऑक्टोबरला शिर्डी विमानतळ भक्तांच्या सेवेसाठी सुरू झाले होते. अवघ्या काही दिवसातच विमातळावरील वर्दळ वाढत गेली आणि एका वर्षातच शिर्डी विमानतळ हे सर्वाधीक पॅसेंजर असणारे देशातील चौथे विमानतळ झाले. मात्र, या पावसाळ्याच्या शेवटी परतीचा मोठा पाऊस झाल्याने शिर्डी विमानतळावर पाहिजे असलेली पाच किलोमीटरची दृश्यमानता कमी झाल्याने अडचणी येत होत्या. त्यामुळे 14 नोव्हेंबरपासून दररोज 14 येणारी आणि 14 जाणारी विमाने पुर्णपणे बंद झाली होती. याचा मोठा फटका शिर्डीला येणाऱ्या प्रवाशांना आणि विमानतळ ते शिर्डी टॅक्सी सेवा देणाऱ्यांना बसला होता. त्यामुळे महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरण कंपनीने तातडीने विमानतळावरील धावपट्टीच्या बाजूला बसवण्यात येत असलेल्या दिव्यांच्या कामांना गती देत ते काम आता जवळपास पुर्णत्वास नेले आहे. त्यामुळे आता बुधवारपासून स्पाईस जेट कंपनीने पुढाकार घेत दिल्ली चेन्नई आणि हैदराबाद येथून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
स्पाईस जेट बुधवारी पहिल्या दिवशी नऊपैकी सहा उड्डाणे सुरू करणार आहेत. त्यानंतर इतर कंपन्यांची विमानसेवाही सुरू होणार आहे. दृश्यमानता कमी असताना रात्रीच्या विमानसेवांसाठी असलेली यंत्रसामुग्री तात्पुरत्या स्वरुपात शिर्डी विमानतळावर वेगाने कार्यान्वित करण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरुपात बसवलेल्या यंत्रणेची पाहणी दिल्लीच्या विमान नागरी उड्डाण संचालनालयाच्या पथकांनी नुकतीच केली. नवीन केलेल्या उपाययोजनेचा अहवाल सकारात्मक आल्याने काकडीतील विमानसेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 'डीव्हीओआर'चे कामही पूर्ण झाले आहे. लवकरच रात्रीची विमानसेवाही सुरू करणार असल्याचे दिपक शास्त्री यांनी सांगितले.
सलग 27 दिवस हे विमानतळ बंद राहिल्यामुळे जवळपास 800 विमाने रद्द झाली होती.