संगमनेर (अहमदनगर) - किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी आपल्या किर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आज संगमनेर सत्र न्यायालयात याबाबतची पहिली सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना समन्स बजावला आहे. येत्या सात ऑगस्टला त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
इंदोरीकर महाराज यांनी गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती. समितीने सर्व पुरावे पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडे सादर केले होते. जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील हे पुरावे दिले होते. मात्र, कारवाई होत नव्हती. अखेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष अॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना कायदेशीर नोटीस बजावली. त्यामध्ये इंदोरीकर महाराज यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक यांना सहआरोपी करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून अॅड. गवांदे यांनी दिला होता. ही तक्रार राज्य आरोग्य विभागाकडे देखील करण्यात आली होती. त्यानंतर पीसीपीएनडीटी समितीची बैठक झाली. या बैठकीत आलेल्या तक्रारी, इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचे व्हिडिओ, वृत्तपत्रांची कात्रणे यांचा विचार करण्यात आला. त्यानंतर पीसीपीएनडीटी समितीने इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास हिरवा कंदिल दिला. त्यानुसार संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी तक्रार आणि पुराव्याचे कागदपत्र संगमनेरच्या प्रथम वर्ग-एक न्यायालयात दाखल केले आहे. त्यावर आज सुनावणी झाली. येत्या सात ऑगस्टला इंदोरीकर महाराजांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नेमके काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज? -
'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते', असे वादग्रस्त वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात केले होते. त्यानंतर इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सामाजिक संघटना, भुमाता ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदींनी केली होती. तसेच काही जणांनी त्यांना समर्थन देखील दिले होते. तसेच समाज माध्यमांवर देखील याबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.