शिर्डी - नाताळ सुट्टी व नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर मंगळवारी (३१ डिसेंबर) दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातली माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
हेही वाचा - अभिनेते राजीव कपूर वाढदिवशी साईचरणी; २० वर्षांपासून न चुकता येतात शिर्डीत
दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतासाठी साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. सर्व भाविकांना साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेता यावे यासाठी मंगळवारी (३१ डिसेंबर) श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरची शेजारती व १ जानेवारी २०२० रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
नाताळ व नवर्षाच्या सुट्टींच्या गर्दीमुळे २५ डिसेंबर, ३१ डिसेंबर व १ जानेवारी २०२० असे तीन दिवस साईबाबांची साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा बंद राहणार आहे. तसेच ३१ डिसेंबर व १ जानेवारी असे दोन दिवस वाहन पूजा बंद राहणार आहे. मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजवण्यास मनाई करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहनही मुगळीकर यांनी केले.
हेही वाचा - महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर साईचरणी; मंत्री कदम यांनीही घेतले दर्शन
दरम्यान, हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागांचे विभागप्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.