अहमदनगर - साईबाबा शिर्डी संस्थानच्या वतीने २६ जुलै रोजी भाविकांना प्रसादाच्या स्वरुपात ५० हजार वृक्षवाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने साईबाबांच्या शिर्डीमधून 'झाडे लावा, झाडे जगवा आणि निसर्ग वाढवा' असा संदेश दिला जात आहेत.
शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीत अनेक समाज प्रबोधनाची कामे केली. जातपात, धर्म, गरीब-श्रीमंत अशा सर्व भिंती तोडून सर्वांना माणुसकीचा संदेश देत एका छताखाली आणले. साईबाबांनी आपल्या हाताने लेंडीबागेची निर्मिती करत वृक्ष संवर्धनाचे मोठे करत निसर्गाचे संवर्धन व्हावे, यासाठीही अनेक कामे केली. शिर्डीत निंबाच्या झाडाचे अनन्य साधारण महत्व आहे.
साईंचा हाच वसा अंगीकृत करत साईबाबा संस्थानने वृक्ष लागवडीचा संकल्प सुरु केला. यातून वृक्ष लागवड व्हावी, तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जावा, हा प्रमुख उद्देश आहे. त्यातून येत्या 26 जुलै रोजी साई संस्थानच्या वतीने एक हजार निंब वृक्षांच्या रोपांसोबत एकूण 50 हजार झाडांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली.
साई मंदिराच्या गेट क्रंमाक ४ जवळ असलेल्या जागेत या वृक्षांचे वाटप केले जाणार आहे. तर साईंच्या गुरुस्थानी असलेल्या निंब वृक्षाचे बिजारोपण करत 100 वृक्ष तयार करण्यात आली आहेत.