शिर्डी (अहमदनगर) Sai Baba Death Anniversary: साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांचा 105 वा पुण्यतिथी उत्सव येत्या 23 ते 26 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी शिर्डीत होणार असल्याने उत्सवाच्या मुख्य दिवशी 24 ऑक्टोबर रोजी साईबाबांचे समाधी मंदिर नेहमीच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार असल्याचही साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी सांगितले आहे. साईबाबांच्या या चार दिवशीय पुण्यतिथी उत्सवा निमित्ताने देश विदेशातून लाखो भाविक साईबाबाच्या समाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत येणार असल्याने या भाविकांना साईबाबा संस्थानच्या सर्व सुविधांचा लाभ मिळावा यासाठी संस्थाने जय्यत तयारी केली आहे.
साईभक्तांना दिल्या जाणार सुविधा: शिर्डीत एका फकीराचं जीवन जगत साईबाबांनी सर्व धर्म समभावाची शिकवण देत 15 ऑक्टोबर 1918 ला विजयादशमीच्या दिवशी आपल देह ठेवला. त्यानंतर दरवर्षी विजयादशमीला शिर्डीत साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातोय. यंदाच हे पुण्यतिथी उत्सवाचं 105 वं वर्ष आहे. या पुण्यतिथी उत्सवाला तीन लाखाहून अधिक भाविक शिर्डीत येणार असल्याने त्याच्या सुविधेसाठीच्या सर्व तयारी साई संस्थानने केल्या आहेत. साईभक्त शिर्डीत आल्यानंतर साजुक तुपातील बुदीं लाडु विकत प्रसाद म्हणून घरी नेतात. त्यामुळे साई संस्थानने तब्बल सहा लाख लाडुंची निर्मिती केली आहे. तसेच साई दर्शनानंतर दर्शन रांगेतून बाहेर पडताना भक्तांना मोफत बुदीचं पाकीट प्रसाद म्हणून दिले जाते. तिही तीन लाख पाकीटे साई संस्थानने तयार केली आहेत.
लाडू विक्री केंद्र: यावर्षी विक्रीसाठी 6 लाख नग प्रसाद लाडू बनवण्यात आले आहेत. याकरिता गेट नंबर 4 जवळ सेवाधाम व साईनाथ छाया इमारत, श्री साईनाथ मंगल कार्यालय, मारुती मंदिराशेजारी साई कॉम्प्लेक्स, श्री साईप्रसादालय तसेच सर्व निवासस्थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहेत.
साई प्रसादालय प्रसाद भोजन व्यवस्था: यावर्षी उत्सव काळात अंदाजे 3 लाखाहून अधिक साईभक्त प्रसाद भोजन घेतील असे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये पहिल्या दिवशी मूंगडाळ शिरा, मुख्य दिवशी जिलेबी, तिसरे दिवशी राजा-राणी बुंदी व चौथे दिवशी बेसन बर्फी / खोबरा बर्फी हे मिष्ठान्न म्हणून प्रसाद भोजनात देण्यात येणार आहेत.
प्रथमोपचार केंद्र: भाविकांच्या सुविधेसाठी गुरुस्थान मंदिरासमोर दीक्षित वाडा, दर्शनरांग, नवीन भक्त निवासस्थान (५०० रुम), साई आश्रम भक्तनिवास, साई धर्मशाळा, श्री साईप्रसादालय तसेच मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत.
सुरक्षाव्यवस्था: उत्सव काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संस्थान सुरक्षा रक्षक, आपतकालीन पथक, अधिकारी यांसह शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत अतिरिक्त कर्मचारी असे एकूण 1500 हून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहे.
बसेसेची व्यवस्था: साईबाबा मंदिर व निवास्थान आणि श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी येणे-जाणेकरिता जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
हेही वाचा:
- PM Narendra Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदींचा 26 ऑक्टोबरला शिर्डी दौरा, विविध कामांचं होणार लोकार्पण
- Rutuja Bhosale in Shirdi : साईबाबांच्या समाधीवर 'सुवर्णपदक' ठेवत ऋतुजा भोसलेंनी घेतलं दर्शन
- Shirdi Sai Baba Darshan Pass : भाविकांची होणारी लूट थांबण्यासाठी साई संस्थाननं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय