अहमदनगर - शिर्डी साईबाबा संस्थानसाठी लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमले जाईल. या संदर्भात मुख्यमंत्राशी चर्चा करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मुश्रीफ यांनी आज शिर्डी साई समाधीचे दर्शन घेतले, त्यावेळी ते बोलत होते.
अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची गरज नाही -
साईबाबा संस्थानचे कामकाज पाहण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपण्याअगोदरच त्यांची बदली केली जात आहे. एका वर्षात तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकारी चांगले काम करत असेल तर, कार्यकाळ पूर्ण होऊपर्यंत त्यांची बदली करण्याची काहीच गरज नसल्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
साईचरणी घातले साकडे -
अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी साईसमाधीचे दर्शन घेतले. संपूर्ण जगातील कोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट कर आणि समस्त मानवजातीला पहिल्या सारखे जगण्याचा आनंद पूर्ववत मिळू दे, असे साकडे मुश्रीफ यांनी साईचरणी घातले. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दोनवेळा शिर्डीमध्ये आलो होतो. मात्र, कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन झाले नव्हते. मी भाग्यवान आहे, आज दर्शन झाले. दर्शन घेऊन धन्य वाटले. साईबाबांनी धर्म-पंथ, जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवजातीच्या उद्धारासाठी केलेले कार्य महान आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.