अहमदनगर- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी पुकारलेला 8 डिसेंबरचा बंद महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांकडून संगमनेर शहर व तालुक्यात कडकडीत पाळण्यात येणार आहे.
संगमनेर शहर व तालुक्यात मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे. दिल्ली येथील शेतकर्यांचे आंदोलन मागील अकरा दिवसांपासून सुरू आहे. या शेतकर्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत केंद्राने केलेले कामगार व शेतकरी विरोधी काळे कायदे तातडीने रद्द करावे यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेसने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेना व राष्ट्रवादी पक्षानेही या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा दिला आहे.
कोल्हापूरमध्येही भारत बंदची हाक-
गेल्या 12 दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. उद्या या शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या बंदला पाठिंबा द्यावा, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आवाहन केले आहे. शिवाय भारत बंद शांततेने पाळून आपली दुकानं बंद ठेवावीत, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले आहे.
हेही वाचा-7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा '; भारत बंद यशस्वी करण्याचं बच्चू कडू यांच आवाहन
बंद यशस्वी करण्याचे आमदार बच्चू कडूंचे आवाहन-
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे दिल्लीत येणारे सर्व रस्ते हे पंजाब, हरयाणा तसेच उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी अडवून धरले आहेत. गेल्या आठवडाभरापासून हे शेतकरी थंडीचा सामना करत दिल्लीच्या रस्त्यावर आहेत. शेतकऱ्यांनी उद्या भारत बंद पुकारला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही भारत बंदला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.