शिर्डी - साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासातील कार पार्किंगमध्ये उभी असलेल्या भाविकांच्या गाडीची भरदिवसा काच फोडून रोख दीड लाख रुपये आणि मोबाईल चोरी गेला आहे. छत्तीसगड येथून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी हे साई भक्त आले होते.
हेही वाचा - विकास कामांना आम्ही थांबवणार नाही - मुख्यमंत्री
त्यांनी साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्त निवासात रविवारी रात्री रुम घेतली होती. आज(मंगळवार) सकाळी 9 वाजता रुम खाली करुन आपल्याकडील सर्व वस्तु आपल्या महिंद्रा एक्ययुव्ही गाडीत ठेवून गाडी भक्त निवासाच्या पार्किंगमध्ये लावली. त्यानंतर ते साई दर्शनासाठी मंदिरात गेले. यावेळीच चोरांनी गाडीची डाव्या बाजुची काच फोडून बॅगसह ऐवज लंपास केला. भट्टाचार्या या साई भक्ताने यासंदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गाडीच्या काचा फोडून चोरी करण्याच्या घटना वाढत आहेत. त्यातच भरदिवसा साई संस्थानच्या पार्किंगमधून तेही सुरक्षा रक्षकांच्या निगरानीतून भाविकांच्या गाडीची काचा फोडली. यातून तब्बल दीड लाख रुपये आणि मोबाईल फोन लंपास केला आहे. त्यामुळे साई संस्थानच्या सुरक्षेवर भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भक्त निवासात सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र, पार्किंगमध्ये सीसीटीव्ही नसल्याने चोरांचा शोध कसा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.