अहमदनगर - अकोले तालुक्यातील बीजमाता म्हणून ओळख असलेल्या राहीबाई गावरान बियांचे संवर्धन करतात. त्यासाठी त्यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ४ महिन्यांपूर्वीच घर बांधून दिले. मात्र, पहिल्याच पावसात बीज बँकेच्या इमारतीला गळती लागली आहे. त्यामुळे इमारतीच्या बांधकामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राहीबाई पोपेरे या अशिक्षित असून त्या कोंभाळणे गावातील रहिवासी आहेत. या महिलेने गावरान बियांचे संरक्षण केले. मात्र, त्यांचे घर लहान असल्याने त्यांना कामामध्ये अडचण निर्माण होत होती. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नवीन घर बांधून देण्याचा संकल्प केला होता. त्यानंतर अवघ्या ४० दिवसात त्यांना घर बांधून देण्यात आले. ३ मार्चला राहीबाईला नवीन घर तसेच बीज बँक मिळाली. मात्र, या घराला पहिल्याच पावसात गळती लागली. घराची कौले उडाली, तर भिंतीमध्ये ओलावा आलेला आहे.
या प्रकारची ठेकेदाराला तक्रार करणार आहे. ठेकेदारांकडून घरातील समस्या दूर करुन घेणार असल्याचे बायफ संस्थेचे पदाधिकारी जितेन साठे यांनी सांगितले.