अहमदनगर - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या राणे समितीत आपण राज्यभर समाजाची परिस्थिती पाहिल्याने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अहवाल दिला व हे भाग्य आपल्याला लाभले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार विरुद्ध लढा देण्यासाठी मी सदैव मराठा समाजाबरोबर असल्याचा विश्वास माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या निषेधार्थ आज अकोले शहरात सकल मराठा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील महात्मा फुले चाैकातुन मराठा मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख, माजी मंत्री मधुकरराव पिचड, मराठा समाजाचे जिल्ह्याचे नेते संभाजी दहातोंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार वैभव पिचड, शेतकरी नेते डॉ. अजित नवले आदी उपस्थित होते.
मराठा समाजातील मुलांना शिक्षणात व नोकरीमध्ये आरक्षण हवे आहे. समाजाने काढलेल्या मुक मोर्चेची दखल मागील सरकारने घेउन आरक्षण दिले होते. आता त्याला न्यायालयात स्थगिती देण्यात आली. आता मराठा समाजाला अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल. ज्यावेळी आवाज दिला जाईल, त्यावेळी आपण समाजाबरोबर उभे राहू, अशी प्रतिक्रिया यावेळी मधुकरराव पिचड यांनी दिली. एका महिन्यात आरक्षणावरील स्थगिती उठवली नाही, तर शिवनेरी ते लाल किल्ला असा मोर्चा काढणार असल्याचा इशाराही मधुकरराव पिचड यांनी दिला.