अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेने जिल्हा व सत्र न्यायालयात, पारनेर न्यायालयाने काढलेल्या स्टँडिंग वॉरंट विरुद्ध पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. हा अर्ज अहमदनगरचे प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीशांनी फेटाळला आहे. त्यामुळे पारनेर न्यायालयाने दिलेला स्टॅंडिंग वॉरंटचा आदेश कायम आहे. 30 नोव्हेंबर 2020ला 25 ते 30 या वयोगटातील दोन आरोपींनी गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून जरे यांचा खून केला होता. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे.
पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळल्याने बोठेच्या अडचणी वाढल्या -
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि गेल्या अडीच महिन्यांपासून फरार असलेला पत्रकार बाळासाहेब बोठे हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे ३ डिसेंबर २०२०ला स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. आतापर्यंत पोलिसांनी पुणे, नाशिक, बीड, उस्मानाबाद, धुळे आदी जिल्ह्यांमध्ये तपास केला आहे. मात्र, अद्याप त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सीआरपीसी कलम 73 अन्वये वॉरंट मिळण्यासाठी पारनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अहवाल सादर केला. त्यावरून न्यायालयाने पारनेर न्यायालयाने स्टॅंडिंग वॉरंट आदेश केलेला आहे. या विरोधात आरोपी बाळ बोठेने जिल्हा न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केलेला होता. त्यामध्ये वॉरंट हुकूम रद्द करण्याबाबत त्याने विनंती केली होती. सोमवारी(२२ फेब्रुवारी) जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आरोपीचे वकील व सरकारी वकीलांचा युक्तिवाद ऐकून, आरोपीने दाखल केलेला पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळून लावला. यामुळे फरार असलेल्या बाळ बोठेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अडीच महिने उलटले तरी बोठे पोलिसांना सापडेना -
रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२०ला जातेगाव घाटात हत्या झाल्यानंतर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जरे यांच्या मुलाने एका आरोपीचा मोबाईलमध्ये फोटो काढला होता. त्यावरून हत्या करणारे दोन आरोपी तसेच इतर तिघांना अशा, एकूण पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा जेष्ठ पत्रकार बाळ बोठे असल्याचे समोर आले. त्याच्यावर तीन डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला. मात्र, तोपर्यंत बोठे फरार झाला होता. आपले मोबाईल आणि पिस्तुल त्याने घरीच ठेवली होती. फरार असलेला बोठे पोलिसांना अद्याप गुंगारा देत आहे. पोलिसांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात जाऊन तपास केला असला तरी तो पोलिसांना सापडत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत रेखा जरे यांच्या मुलाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अनेकदा अर्ज करून बोठेला पकडण्याची विनंती केली आहे. बोठेला काही राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोपही रुणाल जरे याने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात आणि माध्यमांसमोर केला आहे.