अहमदनगर - अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले कळसूबाई शिखर, हरिश्चंद्र, रतनवाडी, रतनगड या परिसरात कोरोना संक्रमण होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. म्हणून, शनिवार-रविवार या दिवशी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली आहे.
अकोले तालुक्यातील शेंडीवन विश्रामगृह येथे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील लोकप्रतिनिधी सरपंच, पोलिस पाटील, वन समिती यांचे अध्यक्ष, सदस्य वन अधिकारी कर्मचारी व पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी बैठक घेतली. या बैठकीत येत्या शनिवार-रविवार पासून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटनासाठी बंद राहणार आहे, असा ठराव संमत करण्यात आला. तर मद्यपान करुन रस्त्यावर उतरणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सांगितले.
कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची 5,400 फूट, म्हणजेच सुमारे 1,646 मीटर आहे. ट्रेकिंगचा छंद असलेल्या शेकडो पर्यटकांची इथे रेलचेल असते. तसेच शिखरावर मंदिर असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. त्यात तिसर्या लाटेचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यभरातून येणार्या लोकांसाठी कळसूबाई शिखर हरिश्चंद्र, रतनवाडी, रतनगड या परिसरात शनिवार-रविवारच्या दिवशी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांना बाहेरून येणार्या पर्यटकांकडून बाधा होऊ नये, यासाठी प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण