अहमदनगर - कल्याण-निर्मल-नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रखडलेले काम पूर्ण केल्याशिवाय पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथील टोलनाका सुरू करण्यात येवू नये, अशी मागणी जलक्रांती जनआंदोलनाचे दत्ता बडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी खरवंडी चौकात शुक्रवारी दुपारी २ तास 'रास्तारोको आंदोलन' करण्यात आले.
कल्याण-निर्मल-नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील ४ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. गेल्या ४ वर्षात ३ ठेकेदार बदलण्यात आले तरीदेखील या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. लोकप्रतिनिधीकडून काम सुरू करण्याबाबत देण्यात आलेले आश्वासन फोल ठरल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
महामार्गाचे काम सुरू झालेले नाही. तरीदेखील फुंदेटाकळी ते पाडळसिंगी दरम्यानच्या महामार्गावर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना वाहनांसाठी विनाकारण टोल भरावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवावा व योग्य पाऊल उचलावे, अशी मागणी दत्ता बडे व आम आदमी पक्षाचे जिल्हा संघटक किसन आव्हाड यांनी केली. वरिष्ठांशी चर्चा करुन स्थानिकांना टोलमधून सूट देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत सुरुवातीचे १५ दिवस स्थानिकांकडून टोल घेणार नसल्याचे आश्वासन महामार्ग विभागाचे अभियंता डी. एफ. पटेकर यांनी दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.