अहमदनगर - शिर्डीतील साईबाबांच्या रामनवमी उत्सवाला आज पहाटे काकड आरतीने सुरुवात झाली. उद्या रामनवमीचा मुख्य दिवस असल्याने उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होत आहेत. या उत्सवासाठी खास करून मुंबईहून मोठ्या प्रमाणात पालख्या दाखल होतात. १५ दिवसांचा पायी प्रवास करून शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविक आतूर झालेला असतो. १०७ वर्षांची परंपरा असणारा हा उत्सव आजही तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो.
रामनवमी उत्सवाचा संपूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी इथं क्लिक करा....
शिर्डीतील रामनवमी उत्सव हा १९११ साली सुरू झाला. प्रथम हा उत्सव उरुसापोटी जन्माला आला. त्यावेळी शिर्डीत मोठ्या प्रमाणात उरुस भरत असे. मात्र, साईभक्त भिष्म यांनी हा उरुस रामनवमी उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची साईबाबांना विनंती केली. तेव्हापासून साईबाबांच्या आज्ञेनेच भिष्म आणि गोपाळराव गुंड या भाविकांनी रामनवमी उत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला असल्याचे पुजारी सांगतात.
मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि सुरत या राज्यातील प्रमुख शहारांच्या बरोबरीनेच अनेक गावातूनही शिर्डीला भाविक पायी चालत येतात. पायी चालत आल्याने आपली दुखः, संकटे दूर करून आपल्या मनोकामना साईबाबा पूर्ण करतात, अशी भाविकांचा श्रद्धा असते.
साई नामाच्या गजराने सुंपूर्ण शिर्डी दुमदुमुन गेली आहे. आज उत्सवाचा पहिला दिवस असल्याने रात्री साईंच्या पालखीची गावातून मिरवणूक काढली जाणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. साईमूर्तीलाही विविध अलंकारांनी सजवण्यात आले आहे.
द्वारकामाई मंडळाच्यावतीने भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. त्यावर स्वामी समर्थ यांची मूर्ती ठेवली असलेली प्रतिमा देखावा उभारण्यात आली आहे. शिर्डी साईबाबा संस्थानच्यावतीने साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.